नांदगाव-: नांदगाव येथील समुद्र किनारा हा अतिशय विहंगम आणि सुरक्षित असल्याने पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अधिक पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे. सुप्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरानजीकच्या बीच सुशोभीकरणाचा शुभारंभ तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ( Beautification of Nandgaon Beach promised by MP Sunil Tatkare)
यावेळी बीच पर्यटन सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष महेश मापगावकर, सचिव प्रतीक दळवी, पंच कमिटी अध्यक्ष उमाकांत चोरघे यांनी स्थानिक लॉज धारकांना अकृषक वापरासाठी परवानगी न घेतल्याबाबत बजावलेल्या नोटिसांसंदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल घेत तटकरे यांनी जिल्हाधिकार्यांसमवेत २ फेब्रुवारी रोजी अलिबागमध्ये एक बैठक घेऊन त्यातून मार्ग काढण्याचे अभिवचन दिले. प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षा स्मिता खेडेकर यांनी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नांदगाव परिसराची विस्तृत माहिती देताना विकास कामे केल्याने तटकरेंचे आभार मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष फैरोज घलटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुबोध महाडिक, सचिव विजय पैर, शहर अध्यक्ष संजय गुंजाळ, विभाग अध्यक्ष योगेंद्र गोयजी, सोशल मीडिया अध्यक्ष हसमुख जैन, महिला अध्यक्षा अॅड. मृणाल खोत, माजी सभापती आशिका ठाकूर, उपसरपंच मेघा मापगावकर, सदस्या वैशाली रणदिवे, अजित शिंदे, संजय भोसले, रवींद्र खेडेकर, आगरदांडा सरपंच आशिष हेदूलकर, नरेंद्र हेदूलकर यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.
स्थानिकांच्या रोजगाराकडे लक्ष देणार
काशीद, मुरुड येथील बीच रस्त्यालगत असल्यामुळे तेथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. या दोन्ही बीचबरोबर रस्त्याच्या आतील भागात असलेल्या नांदगाव बीचचे सुशोभीकरण करून पर्यटक त्याकडे कसे आकर्षित होतील आणि त्याचबरोबर स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न कसा सुटू शकेल, याकडे आपण लक्ष पुरविणार असून, बीच सुशोभीकरणाचा हा पहिला टप्पा असल्याचे ते म्हणाले.