पनवेल : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू असतानाच भाजपचे जिल्हा संपर्कमंत्री आशिष शेलार रायगडमध्ये कामाला लागले आहेत. पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी उठवण्याची मूर्तिकारांची मागणी होत असताना मूर्तिकारांच्या पाठिशी सरकार असल्याची ग्वाही आशिष शेलार यांनी रविवारी पेणमध्ये जाऊन मूर्तिकारांना दिली आहे.
राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीची निर्मिती, विक्री आणि विसर्जनास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी घालली आहे. याला पेणमधील मूर्तिकारांनी 20 फेब्रुवारी रोजी मोठी सभा घेत तीव्र विरोध केला होता. या सभेला मुंबई, ठाण्यासह 22 जिल्ह्यांतील मूर्तिकार उपस्थित होते. या बैठकीत अधिवेशन काळात मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता. त्याप्रमाणे 11 मार्च रोजी मूर्तिकार मुंबईत भव्य मेळावा घेणार आहेत. तत्पूर्वी आशिष शेलार यांनी मूर्तीकारांची भेट घेत सरकार तुमच्या पाठिशी असल्याची ग्वाही देत भाजपचे पारडे जड केले आहे.
मुंबईत मंगळवारी (11 मार्च) होणाऱ्या मूर्तीकारांच्या मेळाव्याला पेणसह राज्यातील मूर्तीकार, कारखानदार तसेच महिला कारागिर सहभागी होणार आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्तींवर बंदी नको, ही बंदी कायमची उठवा, अशी मूर्तिकारांची मागणी आहे. आशिष शेलार यांनी पेणमध्ये मूर्तिकारांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यासोबत पेणचे भाजपचे आमदार रविंद्र पाटील, पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्यसभा सदस्य धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाप्रमुख अविनाश कोळी आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
परळमध्ये मूर्तिकारांचा मेळावा
राज्यभरातील 15 ते 20 हजार मूर्तिकार मंगळवारी होणाऱ्या मेळाव्यात सहभागी होतील, अशी माहिती गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी आपलं महानगरला दिली. परळमधील नरे पार्क मैदानात दुपारी मेळावा होणार असून येथे भाजप नेते आशिष शेलार आणि महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.
(Edited by Avinash Chandane)