अलिबाग : पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आश्रमशाळेतील खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तिला कुठलाही आजार नसताना कुष्ठरोगाची औषधे सुरू करण्यात आली होती. त्याच्या परिणामांनंतर 22 जानेवारी रोजी खुशबूचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने ठाकरे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला असून मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
खुशबू नामदेव ठाकरे ही पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीमध्ये राहायची. ती वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चौथीत शिकत होती. 16 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत तपासणीत तिच्या अंगावरील तीन चट्ट्यांवरून तिला कुष्ठरोग असल्याचे निदान करण्यात आले. 18 डिसेंबरपासून तिच्यावर कुष्ठरोगावरील उपचार सुरू झाले. याची कोणतीही माहिती खुशबूच्या पालकांना देण्यात आली नव्हती.
खुशबूची मोठी बहीणही त्याच शाळेत शिकते. ती सहलीसाठी जात असल्याने तिला भेटण्यासाठी वडील आल्यावर खुशबू आजारी असल्याचे त्यांना कळले. 28 डिसेंबरपर्यंत नामदेव ठाकरे यांना त्यांच्या मुलीला कुष्ठरोगी ठरवल्याचे माहीत नव्हते.
खुशबूला काय झाले?
त्यानंतर वडील तिला घेऊन तांबडी आदिवासी वाडीत आले. त्यावेळी शाळेतून दिलेल्या गोळ्या तिला देण्यास सांगितले होते. या गोळ्या कुष्ठरोगावरील उपचाराच्या आहेत, याची कल्पना खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांना नव्हती. त्यानंतर 3 जानेवारीला त्यांनी खुशबूला पुन्हा आश्रमशाळेत सोडले. कुठलाही आजार नसताना कु्ष्ठरोगाची औषधे घेतल्याने खुशबूच्या अंगावर फोड आले, तिचे हातपाय सुजले आणि ती अत्यवस्थ झाली. 10 जानेवारीनंतर खुशबूच्या शरीरावर औषधाचे परिणाम दिसू लागल्यानंतर आश्रमशाळेने खुशबूच्या वडिलांना बोलावून घेतले. त्यांनी तिला पेण ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यावेळी शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
खुशबूची प्रकृती गंभीर असल्याने तिला पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी कुष्ठरोगाच्या गोळ्या तातडीने बंद करायला सांगितल्या. तेव्हापासून एमजीएममध्ये उपचार घेणाऱ्या खुशबूने 22 जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला.
नोटीस बजावली, कारवाई शून्य

खुशबूच्या मृत्यूनंतर आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकाऱ्यांनी 23 जानेवारी रोजी वरवणे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, 11 दिवसांनंतरही त्यांनी नोटिसीला उत्तर दिले नाही तसेच पेण प्रकल्प अधिकारी कार्यालयाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
कठोर कारवाई करा
खुशबूच्या चेहऱ्यावर जन्मडाग होते. तिला कुष्ठरोग नव्हता. चुकीचे निदान आणि उपचार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे आम्हाला कोणतीही माहिती आश्रमशाळेकडून दिली नाही. म्हणून मुख्याध्यापक आणि अधीक्षिकांवर सरकारने कठोर कारवाई करावी.
– नामदेव ठाकरे, खुशबूचे वडील
प्रत्येकाची चौकशी करावी
कुष्ठरोग नसताना उपचार करून ‘कुसुम’ अभियानाला गालबोट लावले आहे. खुशबूच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रत्येकाची चौकशी करून त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी!
– जैतू पारधी, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते, कर्जत
कुष्ठरोग निर्मुलन शिबिरात निदान
कुष्ठरोग निर्मुलन शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्राकडून या गोळ्या देण्यात आल्या. तसेच तिला ताप आल्यानंतर वाकरुळमधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेले होते.
– अजित पवार, मुख्याध्यापक, आश्रमशाळा वरवणे
नोटीस बजावली
खुशबूला एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यावर मी रुग्णालयात गेलो होतो. २२ जानेवारीला तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
– आत्माराम धाबे, प्रकल्प अधिकारी, पेण आदिवासी प्रकल्प
(Edited by Avinash Chandane)