HomeमहामुंबईरायगडPen News : खुशबूच्या मृत्यूनंतर 10 दिवसांत कारवाई नाहीच, आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचं...

Pen News : खुशबूच्या मृत्यूनंतर 10 दिवसांत कारवाई नाहीच, आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचं चाललंय काय

Subscribe

पनवेल : पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेची विद्यार्थिनी खुशबू नामदेव ठाकरे या चौथीतील विद्यार्थिनीचा 22 जानेवारीला मृत्यू झाला. तिला कोणताही आजार नसताना कुष्ठरोगावरील उपचार केल्याने तिचा मृत्यू झाला. हा निव्वळ हलगर्जीपणा होता. या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावून 10 दिवस झाले. या दिवसांत कोणती कारवाई केली याबाबत आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी काहीही बोलत नाहीत. त्यामुळे खुशबु ठाकरेच्या मृत्यूप्रकरणी काही लपवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा…  Pen News : चिमुरड्या खुशबूच्या मृत्युला जबाबदार कोण, कुणी ठरवलं तिला कुष्ठरोगी, चुकीच्या उपचाराचा बळी

बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीमधील 9 वर्षांच्या खुशबूला कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात कुष्ठरोगी ठरवून 18 डिसेंबर 2024 पासून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर तिच्या अंगावर फोडी आल्या, अंग सुजू लागले, ताप आला. अखेर तिला कामोठीमधील एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यावर तिच्यावर कुष्ठरोगाचे चुकीचे उपचार सुरू करावे स्पष्ट झाले. अखेर 22 जानेवारी 2025 रोजी तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा…  Raigad news : नर्सने उपाशीपोटी काम करायचं का, रायगड जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमधील नर्सची बिकट अवस्था

या प्रकरणात आदिवासी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी खुशबूच्या मृत्यूनंतर लगेचच मुख्याध्यापक आणि आश्रमशाळेच्या अधीक्षिका यांना तातडीने कारणे दाखव नोटीस पाठवल्या. त्याला 10 दिवस उलटून गेले आहेत. त्यांना ना उत्तर मिळाले ना त्यांनी कारवाई केली. एवढेच नाही तर प्रकल्प अधिकारी धाबे आता माध्यमांपासून पळ काढत असल्याचे दिसून आले. दहा दिवसांत प्रकल्प अधिकाऱ्यांनी आरोग्य विभाग आणि शासकीय आश्रमशाळेतील झालेल्या प्रकाराबाबद्दल वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे येथे लपवाछपवीचा संशय व्यक्त करून खुशबुच्या मृत्यूप्रकरणी आदिवासी विकास विभाग आणि आरोग्य विभागावर कारवाई करण्याची मागणी खुशबूच्या आईने केली आहे.

(Edited by Avinash Chandane)