Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडPen News : महिन्यानंतरही खुशबूच्या मृत्युचे गूढ कायम, जनजागृती आदिवासी विकास संस्थेचा बेमुदत उपोषणाचा इशारा

Pen News : महिन्यानंतरही खुशबूच्या मृत्युचे गूढ कायम, जनजागृती आदिवासी विकास संस्थेचा बेमुदत उपोषणाचा इशारा

Subscribe

पनवेल : पेण तालुक्यातील खुशबू ठाकरे या 9 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूला एक महिना झाला. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या पार्श्वभूमीवर जनजागृती आदिवासी विकास संस्था आक्रमक झालेली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत खुशबूच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक न केल्यास जनजागृती आदिवासी विकास संस्था पुढील महिन्यात पेण प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसेल, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष जेतू पारधी यांनी दिला आहे.

पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीमध्ये राहणारी खुशबू नामदेव ठाकरे वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चौथीत शिकत होती. 16 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत तिची तपासणी झाली. त्यात तिच्या अंगावरील तीन चट्ट्यांवरून ती कुष्ठरोगी असल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर 18 डिसेंबरपासून तिच्यावर कुष्ठरोगावरील उपचार सुरू झाले. मात्र, हे करताना तिच्या पालकांपासून ही माहिती लपवण्यात आली.

हेही वाचा…  Mumbai Goa Highway : नवे मंत्री नवा दौरा, मुंबई गोवा महामार्ग रखडलेलाच, कधी संपणार कोकणवासीयांचा वनवास

कोणताही आजार नसताना खुशबूवर कुष्ठरोगाचे उपचार केल्यामुळे तिच्या अंगावर फोड आले, अंग सुजले. तिची तब्येत बिघडली. त्यानंतर आश्रमशाळेने तातडीने तिच्या वडिलांना बोलावून घेतले आणि तिला कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना 22 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. चुकीचे औषधोपचार केल्यामुळे खुशबू ठाकरे या 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सुरुवातीपासूनच जनजागृती आदिवासी विकास संस्था करत आहे. खुशबूच्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी आदिवासी विभागाने पेण पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली.

चौकशी का केली जात नाही?

हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. खुशबूला कुष्ठरोग झाल्याचे चुकीचे निदान कुणी केले, तिच्यावर कुणी उपचार सुरू केले, याबाबत तिच्या पालकांना का माहिती दिली नाही, तिच्या मृत्युची वरवणे शासकीय माध्यमिक आश्रमशाळेने चौकशी का केली नाही, प्रकल्प अधिकारी, पेण आदिवासी प्रकल्प कार्यालयानेही चौकशी का केली नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

… तर बेमुदत उपोषण

सरकारला पत्र देऊन आदिवासी विकास विभागाने खुशबूच्या मृत्युप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत खुशबुच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक होणार नसेल तर मार्चमध्ये आम्ही पेण प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार आहोत.
– जैतू पारधी, अध्यक्ष, जनजागृती आदिवासी विकास संस्था

बायप्सी का केली नाही?

खुशबूवर कुष्ठरोगाचे उपचार केल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तिची बायप्सी करण्याची गरज होती. याकडे कुणी दुर्लक्ष केले? या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
– संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

(Edited by Avinash Chandane)