पेण : रविवारी पहाटेच्या सुमारास शहरातील पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वि. देव शैक्षणिक संकुलावर बाटलीतून पेट्रोल हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणामुळे पेणमध्ये खळबळ उडाली होती. कारण शाळेच्या प्रांगणात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचे तंबू होते. या पेट्रोल बॉम्बच्या हल्ल्यात आग लागली होती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, या हल्ल्याचे कारण समजले नव्हते. त्यामुळे या प्रकाराने शाळा व्यवस्थापन तसेच इतर शाळांनीही धसका घेतला होता. मात्र, पेण पोलिसांनी अवघ्या 48 तासांत म्हणजे बुधवारी संध्याकाळी हल्लेखोऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. समीर नरदास पाटील असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांची त्याची चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा… Uran News : 6 वर्षांची चिमुरडी अन् 6 तास 5 मिनिटांचे पोहणे, उरणच्या परिधी घरतचा विक्रम
कुंभार आळीमधील पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वि. देव शैक्षणिक संकुलात रविवारी (2 फेब्रुवारी) पहाटे काचेच्या बाटलीमधून पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात स्काउट गाईड शिबिराचे आयोजन केले होते. रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक स्काउट गाईडच्या तंबूंवर काचेच्या बाटल्यांमधून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. अशा तीन बाटल्या फेकण्यात आल्या होत्या. या मैदानात नववीतील विद्यार्थ्यांच्या स्काउट गाईड कॅम्पचे आयोजन केले होते. त्यासाठी तात्पुरते सहा तंबू उभारले होते. कॅम्पचे कार्यक्रम झाल्यानंतर रात्री सुमारास सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी स्टाफ गुरुकुल शाळेच्या खोल्यांमध्ये झोपायला गेले होते.
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मैदानावर काहीतरी जळत असल्याचे सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिली. या आगीत सहापैकी एक तंबू खाक झाला होता. त्यानंतर लगेचच पेण पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी पाहणी करून गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समद बेग आणि गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार विशाल झावरे यांचे पथक करत होते. पेण पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासले तसेच घटनास्थळाच्या मार्गावरील सुमारे 55 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. परंतु आरोपीने छुप्या रस्त्याचा वापर केल्याने तो सापडत नव्हता. अखेर गुन्ह्यातील साक्षीदारांची पडताळणी करुन, गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे अथक प्रयत्न करून कौशल्यपूर्वक तपासातून आरोपी समीर नरदास पाटील (वढाव, पेण) याला बुधवारी अटक केली.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनांप्रमाणे उपनिरीक्षक समद बेग, सहाय्यक उपनिरीक्षक राजेश पाटील, हवालदार सचिन व्हस्कोटी, अजिंक्य म्हात्रे, संतोष जाधव, प्रकाश कोकरे, अमोल म्हात्रे,सुशांत भोईर, गोविंद तलवारे या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.
(Edited by Avinash Chandane)