पनवेल / पेण : बुधवार मध्यरात्रीची वेळ. रात्रीचा एक वाजला होता. पेण तालुक्यातील नाडे ग्रामस्थ झोपेच्या आधीन झाले होते. मात्र, अचानक गावात काहीतरी चालले असल्याचा संशय आला. काही गाड्या गावात आल्याचा आवाज आला. तसेच स्मशानात काही लोक येरझारा मारत असल्याचे काहींच्या लक्षात आले. त्यानंतर ग्रामस्थांना एकमेकांना फोन करून जागे केले आणि थेट स्मशानात गेले. तेव्हा तिथं वेगळेच दृष्य दिसले. ग्रामस्थांना पाहून स्मशानात असलेल्या पाच-सहा लोकांनी पळण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी पाठलाग करून दोघांना पकडले. त्यानंतर स्मशानभूमीत अघोरी विद्येचा प्रयोग सुरू होता, असे ग्रामस्थांना कळले.
पेणपासून सात ते आठ किलोमीटरवर वाकरूळ गाव आहे. वाकरूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत नाडे गावच्या स्मशानभूमीत हे अघोरी नाट्य घडले. पाच ते सहा जण या स्मशानभूमीत होते. एका जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून स्मशानाभोवती फिरवले जात होते. ग्रामस्थांनी स्मशानात येत त्या लोकांना याचा जाब विचारतात त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. तरीही ग्रामस्थांना पाठलाग केला आणि दोघांना पकडले. तत्पूर्वी त्यांनी ग्रामस्थांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. ही बाब तातडीने पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समद बेग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मशानभूमीची पाहणी करून पंचनामा केला. ग्रामस्थांनी पकडलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करत अटक केली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपींकडील कार जप्त केली आहे.
पेण पोलिसांना स्मशानभूमीत मानवी कवटी, डमरू, शंख, लिंबू, टाचण्या तसेच हळद, कंकू, होमाचे साहित्य, गोमूत्र, पेटलेला नारळ, पांढरे तसेच रंगीत वस्त्र असे बरेच काही मिळाले.

अटक केलेल्यांमध्ये बिपीन अंबिका शर्मा (29), राजेश किसन म्हात्रे (40) आणि प्रशांत राजेंद्र शिर्के (27) यांचा समावेश आहे. तिघेही नवी मुंबईतील कोपरखैरणेमधून आले होते. त्याविरोधात जादूटोणा कायद्याने तसेच आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी हा अघोरी खेळ सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील करत आहेत.
सूत्रधार लवकरच सापडेल
तिघांचा ११ मार्चपर्यंत रिमांड मिळाला आहे. तिन्ही आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच मुख्य सूत्रधार सापडेल.
– संदीप बागुल, पोलीस निरीक्षक, पेण पोलीस ठाणे
(Edited by Avinash Chandane)