Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडPen News : धरण उशाशी तरीही खारेपाट तहानलेलेच, पेण खारेपाट विभागातील ग्रामस्थांचे हेटवणे कालव्यात आंदोलन

Pen News : धरण उशाशी तरीही खारेपाट तहानलेलेच, पेण खारेपाट विभागातील ग्रामस्थांचे हेटवणे कालव्यात आंदोलन

Subscribe

पेण : हेटवणे धरण झाल्यामुळे पेण तालुक्यातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, अनेक दशकांनंतरही पेण तालुक्यातील खारेपाट भागातील गावांना पिण्याचे पाणी दिलेले नाही. यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली, खूप वेळा उपोषणे करण्यात आले. मात्र, तोंडी आश्वासनांव्यतिरिक्त ग्रामस्थांच्या हाती काहीही लागले नाही. अखेर मंगळवारी (11 मार्च) ग्रामस्थांनी थेट तालुक्यातील हेटवणे धरणावर जाऊन कालव्यात उतरून जलआंदोलन केले.

हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला पुरवले जाते. नवी मुंबईला दिले जाणारे पाणी रद्द करावे, जलबोगद्याचा मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा, लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावेत आदी मागण्या करत खारेपाट विभागातील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी हेटवणे धरणावर जलआंदोलन केले. यावेळी ग्रामस्थ नंदा म्हात्रे यांनी या धरणाच्या पाण्यावर सर्वप्रथम आमचा हक्क असून तो हक्क मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे जाहीर केले. या घोषणेला ग्रामस्थांनीही जबरदस्त प्रतिसाद दिला. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, हेमंत पाटील, सी. आर. म्हात्रे, राजन झेमसे, राजेंद्र म्हात्रे, बळीराम भोईर यांच्यास शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

हेही वाचा…  Raigad News : लाडकी बहीण योजना मुळावर आल्याचा आरोप कंत्राटदारांनी का केला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

हेटवणे धरणातून पेणच्या खारेपाट भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारने 767 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र, चार महिने होऊनही कार्यारंभ आदेश देण्यात आलेसे नाहीत. आता मार्चअखेरनंतर जरी हा कार्यारंभ आदेश आला तरी पावसाळा येईपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे यंदाही खारेपाट भागाला पिण्याचे पाणी मिळणे कठीण आहे. या गलथान कारभाराला सर्वस्वी जबाबदार येथील लोकप्रतिनिधी आहेत, असा आरोप नंदा म्हात्रे यांनी केला. तसेच आज आम्ही प्रशासनाला नोटीस देऊन हेटवणे धरणावर जलआंदोलन केले असले तरी यापुढे पूर्वसूचनेशिवाय येथे येऊन जलसमाधी घेऊ, असा इशारा उत्तर खारेपाट विभागातील रणरागिणी नंदा म्हात्रे यांनी दिला आहे.

सरकारकडून मंजुरीची प्रतीक्षा

खारेपाटला पाणी देण्याच्या प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सरकारकडे प्रस्तावदेखील पाठवला आहे. कामाची मंजुरी मिळाल्यानंतर कालव्याचे काम सुरू होईल. – आर. एस. कापाले, सहाय्यक अभियंता श्रेणी 1

तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

शेती सिंचन प्रकल्पाबाबत जो सेवा हमी कायदा आहे त्यात ज्या अधिकाऱ्यांनी दप्तर दिरंगाई केली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत आम्हाला पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी मिळत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील. – प्रकाश माळी, अध्यक्ष, खारेपाट विभाग संकल्प विकास संघटना

(Edited by Avinash Chandane)