HomeमहामुंबईरायगडPMC Property Tax : थकबाकीदारांविरोधात पनवेल महापालिका आक्रमक, 447 जप्तीच्या नोटिसा, 27...

PMC Property Tax : थकबाकीदारांविरोधात पनवेल महापालिका आक्रमक, 447 जप्तीच्या नोटिसा, 27 वॉरंट

Subscribe

पनवेल : आर्थिक वर्ष 2024-25 संपायला अवघे दोन महिने उरले आहेत. तरीही अनेक मालमत्ताधारकांनी त्यांचे कर न भरल्याने पनवेल महापालिका आक्रमक झाली आहे. महापालिकेने थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात महापालिकेने तब्बल 447 मालमत्ताधारकांवर जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तर 27 मालमत्ताधारकांवर वॉरंट बजावले आहेत. 2016 मध्ये स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेचा मालमत्ताकराबाबत सुरुवातीपासून वाद होता. कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, खारघर हे नोड सिडकोकडून पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे सिडकोचे सेवाशुल्क आणि महापालिकेचा मालमत्ता कर असा दुहेरी कर भरावा लागत असल्याचा मालमत्ताधारकांचा दावा होता. त्यामुळे अजूनही अनेकजण मालमत्ता कर भरत नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा…  Roha Astami Urban Bank : रोहा अष्टमी अर्बन बँकेचा लिलाव रद्द, चार दिवसांत नेमकं काय घडलं

पनवेल महापालिका हद्दीत अंदाजे साडेतीन लाख मालमत्ताधारक असून सुमारे 1 हजार 650 कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात आतापर्यंत 314.5 कोटींचा भरणा झाला आहे. खारघर हौसिंग फेडरेशनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मे 2024 मध्ये निकाल देताना 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांच्या मालमत्ता कराची बिले द्यावेत, असे स्पष्ट केले. तसेच पूर्वलक्ष्यी प्रभावाने मालमत्ता कर आकारू नये, असेही स्पष्ट केले. त्यानुसार मे 2024 पासून पनवेल महापालिकेने दोन वर्षांची बिले नव्याने पाठवली आहेत.

दरम्यान, थकबाकीदारांनी अधिनियम कलम 128 व अनुसूची ड प्रकरण 8 कराधान नियम 47 अन्वये महापालिकेकडे कराचा भरणा न केल्यास थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता जप्त केली जाऊ शकते किंवा करवसुलीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाऊ शकतो. त्यानुसार नोटीस देऊनही मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांना उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या सूचनेनूसार, कर अधीक्षक महेश गायकवाड आणि करअधीक्षक सुनील भोईर यांच्या जप्ती पथकामार्फत खारघर, उपविभाग नावडे, कळंबोली, कामोठे, पनवेल आणि नवीन पनवेल प्रभागामधील थकबाकीदारांच्या मालमत्तेवर जप्ती तसेच मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जात आहे.

नोटिसींचा परिणाम

पनवेल महापालिकेने नोटिसा बजावल्यानंतर मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई अंतर्गत प्रकाश फके यांच्या नेतृत्वातील खारघरच्या वसुली पथकाने एका मॉलकडून तब्बल 86 लाखांचा कर वसूल केला आहे. तसेच खारघरमधील एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेकडून 4.69 कोटींची करवसुली केली आहे.

मालमत्ता कर भरण्याची सुविधा

मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या दंडामध्ये दरमहा 2 टक्क्यांनी वाढ होते. त्यामुळे मालमत्ताधारकांनी त्यांचा कर भरावा, असे आवाहन पनवेल महापालिकेने केले आहे. ऑनलाईन पद्धतीने PMC TAX APP या मोबाईल ॲपवरून पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर भरण्याची सुविधा आहे. तसेच www.panvelmc.org या वेबसाईटवरूनही मालमत्ता कर भरण्याची सुविधा आहे. या शिवाय काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मालमत्ता कर उपायुक्त व सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे यांनी कर भरण्याचे आवाहन थकबाकीदारांना केले आहे.

(Edited by Avinash Chandane)