अलिबाग : बेलोशी बिग बुल्स आणि वरसोली चॅलेजर्स यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर बेलोशी बिग बुल्सने बाजी मारली आणि पीएनपी चषक 2025 वर नाव कोरले. शिवाय या विजयामुळे बेलोशी संघाच्या खात्यात तब्बल पाच लाख रुपयांची भर पडली. उपविजेता वरसोली चॅलेंजर्स संघाला तीन लाखांचा पुरस्कार आणि चषक तर दोन लाखांचा तृतीय पुरस्कार नांदगाव निंजास संघाला प्रदान करण्यात आला. स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेकाप आणि पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू. व्ही. स्पोर्टस् ॲकेडमीने पीएनपी चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. 19 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत कुरुळमधील आझाद मैदानावर ही स्पर्धा झाली.
रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, पीएनपीचे नृपाल पाटील, यू. व्ही. स्पोटर्स ॲकेडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अॅड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, द्वारकानाथ नाईक, अॅड. प्रवीण ठाकूर, माजी नगरसेविका संजना कीर आदींच्या उपस्थितीत विजेत्या बलोशी संघाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बेलोशी बिग बुल्स संघाचे मालक निनाद रसाळ, आशीष नाखवा, वरसोली चॅलेंजर्स संघाचे मालक सुरेश घरत, नांदगाव निंजास संघाचे मालक सरोज दिवेकर, कर्णधार, खेळाडू, हजारो क्रीडाप्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेत अलिबाग, मुरुड व रोहा तालुक्यांतील 24 संघ सहभागी झाले होते.

विजेत्यांवर बक्षिसांची खैरात
मालिकावीर मुस्तकीम मुकादम यांना टोयाटो कार देण्यात आली. स्वराज देवळे, हर्षद टावरी यांना दुचाकीचा लाभ झाला. तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एलईडी टीव्ही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
- सामनावीर – मंथन डाकी
- हॅट्रिकवीर – संकल्प म्हात्रे
- सर्वोत्कृष्ट गोलंदाज – स्वराज देवळे
- सर्वोत्कृष्ट फलंदाज – हर्षद टावरी
- सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक – मंथन डाकी
- सर्वाधिक षटकार – सौरभ गव्हाणकर
- सर्वाधिक चौकार – शिरू वीक
- मालिकावीर – मुस्तकीम मुकादम
(Edited by Avinash Chandane)