पनवेल : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाच्या वादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अगदी विकोपाला गेला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला कानपिचक्या देत गंभीर इशारा दिला आहे. या इशाऱ्यावरून रायगडचे पालकमंत्रिपद भाजपकडे येऊ शकते, अशी शक्यता दरेकर यांनी वर्तवल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आदिती तटकरे यांना १८ जानेवारी रोजी रायगडचे पालकमंत्री नियुक्त केल्यानंतर शिवसेनेचे इच्छुक भरत गोगावले यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तर त्यांच्या समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करून प्रवाशांची प्रचंड गैरसोय केली होती. त्यावर तुला नाही मला… असं होऊ शकते, असे सूचन विधान दरेकर यांनी केले आहे. शिवाय रायगडमध्ये भाजपचेही तीन आमदार आहे, असेही सुनावले आहे.
हेही वाचा…
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले पहिल्यापासूनच इच्छुक होते. किंबहुना त्यांनाच पालकमंत्रिपद मिळेल, असे ते जाहीरपणे सांगत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यानंतर रायगडमधील महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि भरत गोगावले या तिन्ही शिवसेना आमदारांनी तटकरेंविरोधात आघाडी उघडली आहे. त्यानंतर २४ तासांतच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याची नामुश्की मुख्यमंत्र्यांवर ओढावली होती. यावरून ११ दिवसांपासून रायगडसह राज्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात घमासान सुरू आहे. त्यावरून प्रवीण दरेकर यांनी आमदारांनी पक्षाच्या चौकटीत बोलावे, असा सल्ला दिला आहे. ही भांडणे रायगडला शोभणारी नाहीत असेही त्यांनी सुनावले आहे. एवढेच नाही तर वाद रस्त्यावर न आणता नेतृत्वाशी चर्चा करावी, असा सल्लाही दिला आहे.
प्रवीण दरेकर भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आहेत. त्यांच्या शब्दाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी रायगडमध्ये भाजपचे तीन आमदार असल्याचे रोखठोक सांगून एकप्रकारे शिवसेनेला सुनावले आहे. एवढेच नाही तर हा प्रश्न चर्चेने सोडवावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. त्यामुळे खरेच रायगडचा पालकमंत्री भाजपचा झाला तर कोण असेल, याबाबत तर्तवितर्क लढवले जात आहेत. असे असतानाच शिवसेनेच्या भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी या तिन्ही आमदारांनी बुधवारी अजित पवारांच्या भेटीला गेले होते. मात्र, भेट झाली नाही. त्यामुळे आता वेगाने हालचाल सुरू झाली असून दोन दिवसांत पालकमंत्रिपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
(Edited by Avinash Chandane)