HomeमहामुंबईरायगडMumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, महामार्ग पूर्ण होण्याआधीच...

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, महामार्ग पूर्ण होण्याआधीच काँक्रिट रस्त्याला खड्डे

Subscribe

महाड : दीड दशकापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. असे असले तरी सीमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीची असली तरी पडणाऱ्या खड्ड्यांनी वाहनांचे नुकसान होत आहे. शिवाय नव्या काँक्रिटीकरण रस्त्याची अशी अवस्था असेल तर भविष्यात प्रवास करणाऱ्या वाहनांना कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, हे सांगता येत नाही.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जवळपास 17 वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे काम वाया गेल्यानंतर या ठिकाणी पुन्हा काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले आहे. तर इंदापूरपासून कशेडीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात आजही अनेक ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्णच आहे.

हेही वाचा…  PMC Property Tax : थकबाकीदारांविरोधात पनवेल महापालिका आक्रमक, 447 जप्तीच्या नोटिसा, 27 वॉरंट

महाडपासून पोलादपूरपर्यंत काँक्रीटचे काम पूर्ण झालेले असले तरी घिसाडघाईने केलेल्या कामामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडणे तसेच काँक्रीट निघून जाऊ लागल्याने रस्ता खडबडीत होऊ लागला आहे. इंदापूर ते कशेडी या दरम्यान माणगावजवळचा बायपास रस्ता तसेच लोणेरेपासून टेमपाले गावापर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक कारणांमुळे अपूर्ण आहे. यामुळे तयार झालेल्या रस्त्यावरून वेग पकडणाऱ्या वाहनांना या ठिकाणी अचानक ब्रेक लागत आहे. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. लोणेरे गावापासून टेमपाले गावापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या पर्यायी रस्त्यावर वाहने वळवण्यात आली आहेत. मात्र, या पर्यायी रस्त्याची देखील चाळण झाल्याने वाहनांचे नुकसान होऊन वाहनमालकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पनवेल-पळस्पे ते इंदापूर दरम्यान काम सुरू करण्यात आले होते. या डांबरीकरणांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याने रस्त्याचे अल्पावधीतच वाटोळे झाले. महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होत असतानाच पहिल्या टप्प्यात असलेला मार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला. गणपती उत्सवाच्या काळात हे रस्ते दुरुस्त करण्यावर सरकार भर देत देते. मात्र तरीही कोकणात जाणाऱ्या भाविकांची नाराजी कायम होती. या रस्त्याचे डांबरीकरण रद्द करून काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. काँक्रीट रस्त्यामुळे वाहनचालक समाधान व्यक्त करण्याऐवजी काँक्रिट रस्त्याच्या कामावर नाराजीच अधिक आहे.

काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याची असमान पातळी, रस्त्यात खड्डे, पुलांवरील जोड, अपूर्ण दुभाजक यामुळे काँक्रिट रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याने अचानक वाहने वळवली जात आहेत. वेगाने येणाऱ्या वाहनांना समोरील बंदरस्ता पाहून अचानक ब्रेक मारावा लागत आहे. यामुळे चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास आले असे प्रशासन म्हणत असले तरी आजही अपघात होत आहेत, लोक मृत्युमुखी पडत आहेत.

महामार्गाच्या कामाच्या दर्जावर वाहनचालक नाराज आहेत. अनेक ठिकाणी काँक्रिटचा भाग निघून रस्ता खडबडीत झाला आहे. देशात अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत मात्र, मुंबई-गोवा महामार्गाचा याला अपवाद आहे. दीड दशकापासून रस्ता रखडला असून आणखी किती वर्ष वाट पाहावी लागेल, असा प्रश्न कोकणवासीय विचारत आहेत.

(Edited by Avinash Chandane)