पाली : रायगड जिल्ह्यातील पेण आणि सुधागड तालुक्याला बुधवारी (19 फेब्रुवारी) रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के सौम्य स्वरुपाचे असले तरी दोन्ही तालुक्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन्ही तालुक्यांतील लोक भीतीच्या छायेत आहेत. दरम्यान, लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या हादऱ्यात कुठेही आणि कसलेही नुकसान झालेले नाही. बुधवारी राज्यात सर्वत्र शिवजयंतीचा आनंद होता. सर्वत्र जल्लोष होता. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पेण आणि सुधागड तालुक्यात अचानक भूकंपाचे धक्के जाणवले.
रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि पेण तालुक्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर अचानक भूकंपाचे धक्के बसले. लोक झोपेतून जागे झाले आणि घराबाहेर पडले. नक्की काय झाले कुणालाच काही कळत नव्हते. अनेकांच्या घरामधील भांडी, खिडक्यांची दारे, काचा हलत होत्या. या प्रकारामुळे लोक भयभीत झाले आहेत. भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा केंद्रबिंदु कुठे होता, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा… Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अपात्रांची संख्या 9 लाखांवर, ‘हे’ नवीन निकष लागू
सुधागड तालुक्यात गुरुवारी (20 फेब्रुवारी) पहाटे 5 च्या सुमारासही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पेणच्या तिलोरे, वरवणे, झापडी, दिवाणमाळ, भेंड्याचीवाडी व सिंधळाचीवाडी तर सुधागडमधील महागाव, भोपेचीवाडी, देऊळवाडी, कवेळीवाडी, चंदरगाव, चंदरगाव आदिवासी वाडी भागात जमिनीला हादरे बसले. त्यानंतर भीतीने लोक जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांनी भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांना भेट दिली. या भूकंपात कोणाचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली. तर लोकांनी घाबरुन जाऊ नये, तसेच आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नक्की काय घडले याची माहिती संबंधित यंत्रणा गोळा करत आहे.
हेटवणे धरण परिसरात धक्के
पेण तालुक्यातील हेटवणे धरणापासून काही अंतरावर असणाऱ्या तिलोर आणि महागाव परिसरात बुधवार रात्रीपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पहिला धक्का जाणवला, त्यानंतरही काही सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांनी सांगितले. या धक्क्यांनंतर घरातील भांडी पडली, भिंतीवर अडकवलेल्या अनेक वस्तू पडल्या. परंतु कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. जिल्हा प्रशासन या संदर्भात अलर्ट मोडवर असून अधिक माहिती घेत आहे.
भूकंप नाही, सर्वेक्षण करणार
हा भूकंप नसून याबाबत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, पुणे यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
– किशन जावळे, जिल्हाधिकारी
भूकंपाची नोंद नाही
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने भूकंपमापन केंद्र पुणे आणि कोयना नगर येथे संपर्क साधला असता भूकंपाची कोणतीही नोंद सापडली नाही. भूकंपामुळे जीवित तसेच वित्तीय हानी झालेली नाही. महसूल विभागाचे पथक गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. – तानाजी शेजाळ, तहसीलदार, पेण
(Edited by Avinash Chandane)