Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडAlibag News : फोटोत दाखवले तसे रुग्णालय न बांधल्यास दमडीही देणार नाही, अलिबागमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कडाडले

Alibag News : फोटोत दाखवले तसे रुग्णालय न बांधल्यास दमडीही देणार नाही, अलिबागमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कडाडले

Subscribe

पनवेल : जिल्ह्यातील रुग्णांना चांगले उपचार आणि तेही वेळेत देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी अलिबागमध्ये दिली. ते रायगड जिल्हा रग्णालयाच्या 300 बेडच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आले होते. त्यानंतर फोटोत जशी इमारत दाखवली आहे तशीच सुंदर वास्तू न बांधल्यास एक दमडीही देणार नाही, असा सज्जड दम बांधकाम विभागाला दिला. या निमित्ताने जिल्हा रुग्णालयाच्या सध्याच्या वास्तुचे वास्तव सर्वांच्या निदर्शनास आले. उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्याही हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

ग्रामीण जनतेसाठी जिल्हा रुग्णालय महत्त्वाचे असून या माध्यमातून लोकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहेत. राज्य सरकारने विनामूल्य आरोग्य सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे, असे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी जिल्हा रुग्णालयाची इमारत अतिशय उत्तम बांधली गेली पाहिजे, यात कुठल्याही तडजोड चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. रुग्णालय बांधकामाचा खर्च 450 कोटींचा असून पहिल्या टप्प्यासाठी दीडशे कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेंद्र दळवी यांनी दिली.

हेही वाचा…  Shinde Vs Tatkare : महायुतीत वाद पेटला! शिंदे गटाच्या आमदाराने सुनील तटकरेंना दिली औरंगजेबाची उपमा

पालकमंत्री म्हणून निधी दिला

तत्कालीन पालकमंत्री म्हणून या रुग्णालयाला मंजुरी आणि निधी मंजूर केल्याचे यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच रुग्णालयाचे बांधकाम दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांना सहकार्य करू, अशी ग्वाही उदय सामंत यांनी यावेळी दिली.

या भूमिपूजन कार्यक्रमाला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, अशोक नांदापूरकर (आरोग्य विभागाचे उपसंचालक), जिल्हा शल्य चिकित्सक रायगड डॉ. निशिकांत पाटील, डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे आदी उपस्थित होते.

असे असेल नवे रुग्णालय

  • 7 मजली इमारत, 300 बेडची व्यवस्था
  • तब्बल 2 लाख चौरस फुटांची वास्तू
  • 20 बेड – अतिदक्षता विभाग
  • 16 बेड – नवजात बालक उपचार केंद्र
  • 20 बेड – डायलिसीस युनिट
  • अपघात विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष
  • हायटेक सामुग्रीसह 5 शस्त्रक्रिया कक्ष
  • एचआयव्ही, एचएसबी बधितासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष
  • क्ष-किरण कक्ष, लॉड्री, किचन

(Edited by Avinash Chandane)