HomeमहामुंबईरायगडRaigad News : पांढरा कांद्यामुळे शेतकऱ्यांचे उखळ पांढरे, आता फक्त आठवडाभराची प्रतीक्षा

Raigad News : पांढरा कांद्यामुळे शेतकऱ्यांचे उखळ पांढरे, आता फक्त आठवडाभराची प्रतीक्षा

Subscribe

अलिबाग : पांढरा कांदा ही रायगड जिल्ह्याची ओळख आहे. म्हणूनच चविष्ट आणि आरोग्यदायी अशा पांढऱ्या कांद्याला राज्यातून प्रचंड मागणी असते. आणखी आठवडाभरात पांढरा कांदा विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याने अगोदरच मागणी नोंदण्यात आल्याची माहिती पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. यंदा अलिबाग तालुक्यातील 300 हेक्टरमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली असून दरवर्षी अंदाजे पाच ते साडेपाच हजार टन उत्पादन घेतले जाते. अलिबागच्या पांढर्‍या कांद्याचे वेगळे गुणधर्म असल्यामुळे केंद्र सरकारने पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन (जीआय) देण्यात मान्यता दिली आहे.

दिवाळीच्या सुमारास भात कापणी झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये कांद्याची लागवड केली जाते. दोन ते अडीच महिन्यांत कांद्याचे पीक तयार होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी कांदा काढण्यास सुरुवात केल्यामुळे आठवडाभरात पांढऱ्या कांद्याच्या माळी तयार होऊन बाजारातील प्रतीक्षा संपणार आहे.

हेही वाचा…  Jayant Patil : ‘शेकाप’त फूट! जयंत पाटलांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पुतण्या अन् भाचा भाजपच्या वाटेवर

अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, वाडगांव आदी परिसरातील गावांमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली असून या कांद्याला खूप मागणी असते. आजच्या घडीला मुंबईसह पुणे, रत्नागिरी, नवी मुंबईतून मोठी मागणी आल्याचे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी सांगितले. रायगडसह कोकणात येणार पर्यटक आवर्जून कांद्याची माळ खरेदी करतात. वडखळ येथील बाजार यापूर्वी कांद्याच्या माळींसाठी प्रसिद्ध होता. आता मुंबई-गोवा महामार्ग बाहेरून गेल्यामुळे वडखळची बाजारपेठ पर्यटकांशिवाय ओस पडली आहे.

अलिबाग तालुक्यात तयार झालेला पांढरा कांदा दाखवताना शेतकरी

पांढरा कांद्यामुळे स्थानिकांना रोजगाराची चांगली संधी मिळते. कांदा काढणी, त्याच्या माळा तयार करणे यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होतो. यावेळी कांदा काढणीपासून माळा तयार करण्याचा हंगाम मार्चपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असल्याने शेकडो जणांना या कालावधीत चांगले उत्पन्न मिळणार आहे. कांदा लागवडीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गेल्यावर्षी पाऊस उशिरापर्यंत पडला होता. शेतात पाणी असल्यामुळे भात कापणी उशिरा झाली. त्यामुळे कांदा लागवडीलाही उशीर झाला होता. गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने पांढरा कांदा लागवडीवर भर दिला होता. रायगड जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र 1 हजार हेक्टर करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 6 डिसेंबर 2024 रोजी दिली होती. त्यामुळे यंदापासून कांदा लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

कांद्याच्या माळीचा भाव

वाढलेले मजुरीचे दर, कांदा लागवडीपासून बाजारात पाठवण्याचा वाढलेला खर्च लक्षात घेता यंदा पांढर्‍या कांद्याचे दर वाढू शकतील. पहिल्या टप्प्यातील कांद्याची माळीसाठी ग्राहकांनी 300 रुपये मोजावे लागतील. त्यामुळे यंदा चार माळींसाठी खिशा 1200 रुपयांनी हलका होणार आहे, अशी माहिती कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी दिली.

चविष्ट आणि आरोग्यवर्धक पांढऱ्या कांदा

पांढरा कांदा लागवडीतून शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. येथील चविष्ट आणि आरोग्यवर्धक पांढऱ्या कांद्याला प्रचंड मागणी आहे. जीआय मानांकनामुळेही पांढऱ्या कांद्याचे महत्त्व वाढले आहे. यंदा 26 जानेवारीपर्यंत कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे.
– सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी

(Edited by Avinash Chandane)