Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडRaigad News : दौलतगडावर संकष्टीला गणेश दर्शन, स्वच्छता मोहिमेत आढळली पुरातन गणेशमूर्ती

Raigad News : दौलतगडावर संकष्टीला गणेश दर्शन, स्वच्छता मोहिमेत आढळली पुरातन गणेशमूर्ती

Subscribe

महाड : रविवारी संकष्टी चतुर्थी असतानाच दासगाव येथील दौलतगडावर गणपतीची जवळपास 700 वर्षांपूर्वीची पाषाण मूर्ती सापडली आहे. त्यामुळे संकष्टी पावली अशी प्रतिक्रिया गणेश भाविकांनी दिली आहे. दरम्यान, या मूर्तीची विधीवत स्थापना करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

दासगाव येथील दौलतगडावर दौलतगड प्रतिष्ठान वतीने तीन वर्षांपासून दर शनिवार-रविवारी साफसफाई मोहीम राबवली जात आहे. रविवारी अशीच स्वच्छता मोहीम सुरू असताना देवव्रत निवाते याला प्राथमिक शाळा दासगावच्या बाजूला बुरुजाच्या पायथ्याशी एक दगडी शिळा दिसली. कुतूहल म्हणून त्याने ती पाहिली असता ती गणपतीची मूर्ती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दौलतगड प्रतिष्ठानने इतिहास अभ्यासक प्रा. अंजय धनावडे (इतिहास परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष) यांना याची माहिती कळवली. त्यांनी तातडीने येऊन मूर्तीची पाहणी केली.

हेही वाचा…  Raigad News : ट्रिपल तलाक प्रकरणी रायगडमध्ये पहिला गुन्हा, महाडमध्ये नक्की घडलं तरी काय

अंदाजे 14 व्या शतकातील शिलाहार राजे वंशातील शिल्पशैलीचा प्रभाव असलेली डाव्या सोंडेची चतुर्भूज पाषाणमूर्ती असल्याचे त्यांनी सांगितले. हा चार हातांचा गणपती असून ही मूर्ती सव्वा फूट उंच आहे. गणपतीची पुरातन मूर्ती आढळल्याने दौलतगडावर पुरातत्व विभागाकडून संशोधन करण्याची मागणी होत आहे.

ऐतिहासिक महाड तालुक्यातील परिसरात आजही असंख्य पुरातन वास्तू आणि अवशेष सापडत असतात. किल्ले रायगड परिसरात असंख्य तोफा, तोफगोळे, भांडी, वाड्यांचे अवशेष सापडले आहेत. तर महाड शहरात सावित्री नदीकिनारी इमारतींच्या बांधकामासाठी केलेल्या खोदकामात बहामी काळातील भांडी व आभूषणांचे अवशेष सापडले आहेत.

(Edited by Avinash Chandane)