अलिबाग : राज्यात पोलिसांनी बांगलादेशींविरोधात मोहीम धारदार केली आहे. याला रायगड पोलिसांचाही अपवाद नाही. रविवारी (12 जानेवारी) महाड एमआयडीसी पोलिसांनी पिंपळदरी मोरांडे येथून 18 जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील सहा जणांनी ते बांगलादेशी घुसखोर असल्याची कबुली आहे. या सहा जणांमध्ये पाच पुरुष आणि एक महिला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सर्च बांगलादेशी मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे..
स्थानिक कामगार काम करत नाही, अशी ओरड अनेक कंत्राटदार करतात आणि परप्रांतीय कामगारांकडून कामे करून घेतात. कामगार म्हणून वावरणारे बहुतांश परप्रांतीय बांगलादेशी असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मागील काही वर्षांपासून 27 हून अधिक बांगलादेशींनी जिल्ह्यामध्ये घुसखोरी केल्याचे अधिकृत आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. कामगार म्हणून एका कंत्राटदाराच्या मदतीने ते स्वतःचे अस्तित्व लपवून ठेवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा… Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार, काय सांगतात आकडे
रायगड जिल्ह्यामध्ये आठवड्यापासून सर्च बांगलादेशी मोहीम जोरदार राबवली जात आहे. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांतील पोलीस कामाला लागले. वेगवेगळ्या खबर्यांकडून माहिती घेऊन घुसखोर बांगलादेशींचा शोध सुरू करण्यात आला आहे. महाडमधील पिंपळदरी मोरांडे वाडी येथे बांगलादेशी कामगार म्हणून राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महाड एमआयडीसी पोलिसांनी तपास पथक तयार करून एका घरावर छापा टाकला. त्या घरात पोलिसांना एक महिला आणि पाच पुरुष असे सहा जण दिसून आले. चंद्रकांत शिंदे यांच्या घरात ही मंडळी राहात होती. काही महिन्यांपासून पीडीआयपीएल या बांधकाम कंपनीने रस्त्याच्या कामांसाठी त्यांना कामगार म्हणून ठेवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्या सहाही जणांची चौकशी केली. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाची कोणतीही कागदपत्रे नव्हती.
हेही वाचा… हिरवाईच्या कवेत खारघरमध्ये भव्य इस्कॉन मंदिर, 200 कोटींच्या मंदिराची जाणून घ्या खासीयत
या सर्वांनी गरिबीला कंटाळून पोटापाण्यासाठी भारतात घुसखोरी केल्याची कबुली दिली आहे. महाड तालुक्यातील पिंपळदरीबरोबरच वरंध या ठिकाणी हे नागरिक राहात होते. जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण झपाट्याने होत आहे. वेगवेगळ्या कामानिमित्त परराज्यातून कामगारांना बोलावले जाते. रस्ते आणि इतर बांधकामांसाठी परराज्यातील कामगारांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, यातील काही कामगार बांगलादेशातील असूनही ते कंत्राटदाराच्या मदतीने ओळख लपवून राहात आहेत. काही कंत्राटदार त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बांगलादेशींना कमी पैशात राबवून घेतात. त्यांची भाड्याच्या खोलीमध्ये राहण्याची व्यवस्थादेखील करतात. याची साधी कुणकुणदेखील स्थानिक पोलिसांना लागू देत नसल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्यावर्षीपर्यंत (2024) 21 आणि आता 6 बांगलादेशींना पकडण्यात आले आहे.
रायगड पोलीस सक्रिय
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी विरोधात रायगड जिल्ह्यात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. महाडमध्ये सहा बांगलादेशी पोलिसांना सापडले आहेत. संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
(Edited by Avinash Chandane)