श्रीवर्धन : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या बागमांडला ते बाणकोट पुलाचे नव्याने नव्या जागी काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे 12 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कामावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात कुणाची चूक होती, कोणाचे नियोजन चुकले याबाबत अनेक चर्चा होत आहेत. मात्र, 12 वर्षांपूर्वी ज्या कामाला सुरुवात केली तेच काम आता पुन्हा सुरू झाल्याने सरकारच्या नियोजनावर लोकांकडून सडकून टीका होत आहे.
बागमांडला ते बाणकोट पुलाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मिळवले होते. 2012-13 मध्ये पुलासाठी 182 कोटींचा खर्च अपेक्षित होता. पुढे या खाडीमधून मोठी जहाजे जातील या कारणाने पुलाची उंची वाढवून पुलाचा खर्च 450 कोटींवर नेण्यात आला होता. प्रत्यक्षात मोठी जहाजे जातील, एवढी बाणकोट खाडीची लांबी, रुंदी आणि खोली नाही. दरम्यान, कंपनीने पुलाचे पिलरच उभे करून हे काम अर्धवट सोडल्याची बाब समोर आली. त्या पुलाच्या कामावर किती खर्च झाला, कंत्राटदार कंपनीला किती पैसे दिले माहीत नाही. त्याला मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नवीन जाहीर निविदा काढून अलीकडेच नव्याने नव्या जागी पुलाचे काम सुरू केले आहे. 2012 मध्ये सुरू झालेले काम 2015 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. तसे झाले असते तर रायगड आणि रत्नागिरी जिल्हे एकमेकांना जोडल्यामुळे पर्यटन व्यवसाय आणखी बहरला असता.
हेही वाचा… Alibag News : चार दशकांनंतर ऑलिव्ह रिडले कासवांचे अलिबागमध्ये पुनरागमन, किहीम बीचवर अंडी
2012-13 मध्ये बागमांडला ते बाणकोट पुलाचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मोठ्या धुमधडाक्यात भूमिपूजन केले होते. त्यावेळी राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. भुजबळ हरेश्वर, बागमंडला येथे येणार म्हणून भर पावसात सार्वजनिक बांधकाम विभागाने ओल्या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर झालेल्या जोरदार पावसात रस्ता पूर्णपणे उखडून गेला होता.
आता बागमांडला-बाणकोट पुलाचे काम नव्याने सुरू झाले आहे. जुन्या जागेपासून काही अंतरावरच हे काम सुरू आहे. घाटमाथ्यावरून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना गणपतीपुळेकडून श्रीवर्धन, हरिहरेश्वरकडे येण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा असेल. तर पुण्यातून श्रीवर्धनला येणाऱ्या पर्यटकांना गणपतीपुळे किंवा रत्नागिरीला जाण्यासाठीही हा पूल महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. नव्याने सुरू झालेले पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, एवढीच अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
(Edited by Avinash Chandane)