HomeमहामुंबईरायगडRaigad News : बेकायदा भरावाविरोधात बोर्ली ग्रामपंचायत आक्रमक, प्रजासत्ताक दिनी मुरुड तहसीलसमोर...

Raigad News : बेकायदा भरावाविरोधात बोर्ली ग्रामपंचायत आक्रमक, प्रजासत्ताक दिनी मुरुड तहसीलसमोर आंदोलन

Subscribe

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोलमांडला येथे खारफुटीवर मातीचा बेकायदा भराव टाकून कांदळवने कायमची नष्ट करणाऱ्या प्रयत्न होत आहे. या प्रकरणी गौरव सत्यपाल जैन यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी बोर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना संजय जायपाटील यांनी विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकण, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारीद्वारे केली होती. या घटनेला आठवडा उलटूनही जैन यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न केल्याने बोर्ली ग्रामपंचायतीने मुरुड तहसीलदार यांना प्रजासत्ताक दिनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मुरुड तालुक्यातील कोलमांडला येथे कांदळवनांचे विस्तीर्ण जंगल मोठ्या प्रमाणात आहे. ही कांदळवने समुद्रालगतच असल्यामुळे भरती-आहोटीच्या पाण्यापासून कोलमांडला तसेच बोर्ली गावातील घरांचे संरक्षण होत आहे. या कांदळवनांमधील क्षेत्रामध्ये बोर्लीचे कोळी तसेच आदिवासी समाजाचे लोक खेकडे (चिंबोऱ्या) पकडून तसेच कालवे काढून, निवट्या पकडून उदरनिर्वाह करत आहेत. असे असताना गौरव सत्यपाल जैन यांनी गट क्र. 59, 61, 100 ते 110, 115 या मिळकतींवरील कांदळवने बेकायदा मातीचा भराव टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रार सरपंच सपना जायपाटील यांनी केली होती. यामुळे आगरी, कोळी, आदिवासी बांधवावर उपासमारीची वेळ येणार आहे. या भरावामुळे पावसाळ्यात कोलमांडला गावाबरोबरच बोर्ली गाव तसेच बोर्ली नाका पाण्यामध्ये बुडू शकते, याकडे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा…  Snehal Jagtap : भाजपच्या वाटेवर अशी चर्चा का, स्नेहल जगताप काय म्हणाल्या

या कांदळवनामुळे येथे परदेशी पक्ष्यांचेही वास्तव्य असते. गौरव सत्यपाल जैन यांनी महसूल तसेच वन विभागाची परवानगी न घेता पर्यावरण कायदा धाब्यावर बसवून कांदळवनावर बेकायदा भराव सुरू केला आहे. या भरावामुळे पावसाळयामध्ये कोलमांडला गावाबरोबरच बोर्ली गाव तसेच बोर्ली नाका पाण्याखाली जाणार आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे पावसाचे पाणी, नदीला आलेला पूर आणि समुद्रातील भरतीमुळे बोर्ली परिसरातील दुकाने आणि घरांमध्ये चार फुटांपर्यंत पाणी भरले होते. यात ग्रामस्थांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे आणि नियम सांगितले आहेत. पण, सरकारी अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

कांदळवनांवरील बेकायदा भरावाविरुध्द 14 जानेवारी 2025 रोजी लेखी तक्रार जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी, विभागीय वन अधिकारी दक्षिण कोकण, मुरुडचे तहसीलदार, आयुक्त कोकण विभाग मुंबई यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार अर्ज दिले आहेत. तरीही गौरव सत्यपाल जैन यांच्या दबावाखाली कोणताही अधिकारी कारवाई करण्यास पुढे येत नाही ही मोठी शोकांतिका असल्याची खंत सरपंच सपना जायपाटील यांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच बेकायदेशीर भरावाच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा बोर्लीच्या सरपंच सपना जायपाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

(Edited by Avinash Chandane)