अलिबाग : तीन दिवसांपूर्वी पुण्याहून अलिबागला आलेल्या महिला पर्यटकाने दारूच्या नशेत धुडगूस घातला होता. या महिलेना दारूच्या नशेत अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच पुण्याच्या आणखी एका पर्यटकाने दारूच्या नशेत आणखी एक प्रताप केला आहे. पुण्याहून अलिबागला पर्यटनासाठी आलेला हा पर्यटक कार्लेखिंडीच्या दरीच कोसळला. रविवारी (9 मार्च) सायंकाळी उशिरा ही दुर्घटना घडली. या पर्यटकाला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने वाचवले आणि जखमी अवस्थेत गोठेघर येथील प्रयास रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोसावी यांना पुण्याला रवाना केले आहे. गंभीर बाब म्हणजे हा पर्यटक मद्यधुंद अवस्थेत होता.
पुण्यातील हरिश्चंद्र गोसावी आणि त्यांचे मित्रमंडळी वाहन घेऊन अलिबागला भटकंतीसाठी आले होते. अलिबागहून परतण्यापूर्वी त्यांनी दारूपार्टी केली आणि संध्याकाळी पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अलिबागपासून काही अंतरावर पेणकडे जाताना कार्लेखिंड लागते. या कार्लेखिंडीत पात्रूदेवीजवळ गाडी उभी करून हरिश्चंद्र गोसावी लघुशंकेसाठी उतरले. बाजूच्या कठड्याजवळ गेले आणि नशेत असल्यामुळे तिथेच तोल जाऊन दरीत कोसळले.
हेही वाचा… Raigad News : रायगडमधील वणवे निसर्गाच्या मुळावर, 5 वर्षांत तब्बल 1 हजार 89 वणवे
त्यानंतर गोसावींसोबत असलेल्या मित्रांनी काही लोकांकडे मदत मागितली. त्यातील एकाने तात्काळ वाहतूक कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता वाहतूक शाखेचे हवालदार अमित साळुंखे आणि शिर्के तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थित लोकांची मदत घेत पाऊण तासाच्या अथक प्रयत्नाने हरिश्चंद्र गोसावी यांना जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढले. त्यानंतर गोठेघर येथील प्रयास रुग्णालयात दाखल केले. डॉ. रवी म्हात्रे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने पुण्याला पाठवले.
गोसावींच्या मानेला जखम
हरिश्चंद्र गोसावी यांच्या मानेला जखम झाली तसेच हातापायामध्ये ताकत राहिली नव्हती. म्हणून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पुण्याला पाठवले. रुग्णासोबत त्यांचे मित्र आहेत.
– डॉ. रवी म्हात्रे, गोठेघर
(Edited by Avinash Chandane)