Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडRaigad News : रायगडमधील वणवे निसर्गाच्या मुळावर, 5 वर्षांत तब्बल 1 हजार 89 वणवे

Raigad News : रायगडमधील वणवे निसर्गाच्या मुळावर, 5 वर्षांत तब्बल 1 हजार 89 वणवे

Subscribe

पनवेल / पाली : रायगड जिल्ह्यात वारंवार वणवे लागत असून यात निसर्गाची प्रचंड हानी होत आहे. शनिवारी (8 मार्च) संध्याकाळी उशिरा सुधागड तालुक्यातील पालीजवळील सरसगडावर मोठा वणवा लागला. हा वणवा एवढा भीषण होता की यात अनेक वृक्ष, वनसंपदा यात खाक झाली असून पशूपक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

पाली सरसगडावर शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर वणवा लागला. आधीच वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे वणवा भडकला. ही माहिती मिळतात सर्वांची धावाधाव सुरू झाली. वन विभागाचे वनक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे आणि संतोष भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश दबडे, वनरक्षक विनोद चव्हाण, संकेत गायकवाड, संदीप ठाकरे, जितेंद्र शिंदे, वनमजूर नामदेव पुंजारे, गोविंद लांगी, पांडुरंग पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अमित निबाळकर व मिलिंद गोळे वणवा विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मात्र, वणवा विझवण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे पाणी आणून वणवा विझवणे खूप अवघड जात होते. आगीचे रौद्ररूप, झाडी-झुडपे, खाजकुयलीचा उपद्रव आणि तीव्र उताराचा अडसर यामुळे वणवा विझवणे तातडीने शक्य होत नव्हते.

हेही वाचा…  Navi Mumbai News : महिला दिनी महिलांच्या डिशमध्ये चक्क उंदीर, ऐरोलीतील हॉटेलचा प्रताप, रबाळे पोलिसांकडूनही महिलांची अवहेलना

विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून सरसगडावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे काम केले जात आहे. पण, वणव्यांमुळे ही सर्व झाडे जळाली आहेत. वणव्यांमुळे येथील वृक्षराजी, वनसंपदा, पशुपक्षी यांचा अधिवास धोक्यात आला आहे. शिवाय ऐतिहासिक ठेवादेखील धोक्यात येत आहे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. वारवार लागणाऱ्या वणव्यांमुळे किल्ल्याचे आणि त्याच्या आसपासच्या पर्यावरणाचे अमाप नुकसान होत आहे. येथील जुने वृक्ष, तसेच संवर्धन केलेल्या वनसंपदेचे नुकसान झाले आहे तर पशूपक्ष्यांचे खाद्य आगीच्या भक्षस्थानी गेले आहे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांची गरज आहे, याकडे स्थानिक आणि दुर्गप्रेमींनी लक्ष वेधले आहे.

३ हजार हेक्टरवरील जंगल खाक

रायगड जिल्ह्यात 5 वर्षांत तब्बल 1 हजार 89 वणवे लागले असून यात 3 हजार 71 हेक्टरवरील वनसंपदा खाक झाली आहे. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे पशूपक्ष्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर जंगले खाक होत असल्याने तापमानात वाढ होत आहे. गंभीर बाब म्हणजे यातील 90 टक्के वणवे माणसांच्या चुकीमुळे लागल्याचे सांगण्यात येते.

रायगडमधील वणव्याच्या काही घटना

रोह्यात 48 घरे खाक

रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगरवाडीतील 48 घरे वणव्यात खाक झाली. ही दुर्घटना गुरुवारी (5 मार्च) घडली. यात जीवितहानी टळती असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. रोहा अग्निशमन दल तसेच एसव्हीआरएस बचाव पथकांच्या प्रयत्नांनंतरही 48 घरे खाक झाली.

झापमध्ये पेंढा पेटला

सुधागड तालुक्यातील झाप गावात 26 फेब्रुवारी रोजी दुपारी वणवा पेटून मंगेश भालेराव, चंद्रगुप्त भालेराव आणि सुधीर भालेराव या शेतकऱ्यांच्या शेतातील पेंढ्याच्या गंज्या खाक झाल्या होत्या. यात त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तिन्ही शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नुकसानभरपाईची अपेक्षा आहे.

वावोशी डोंगराला झळ

खालापूर तालुक्यातील वावोशी गावालगतच्या डोंगरावर 4 फेब्रुवारी रोजी वणवा पेटला होता. यात एक हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले होते. ग्रामस्थ-प्रशासनाने पुढाकार घेतल्याने वणवा विझवण्यात यश आले होते. मात्र, वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे चिंता वाढली आहे.

(Edited by Avinash Chandane)