पाली : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात शिकाऱ्यांचा वावर असल्याची असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मंगळवारी (11 मार्च) मध्यरात्रीच्या प्रकारानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो शिकारी असावा असा अंदाज काढला आहे. याचा मुख्य पुरावा म्हणजे सापडलेली बंदूक. सुधागड तालुक्यात जंगले आहेत. या जंगलात शिकार केली जात असावी. या संशयातून आता बंदूक जप्त करून तो शिकारी कोण, याचा शोध वन विभागाने सुरू केला आहे. तशी तक्रारदेखील पाली पोलीस ठाण्यात वन विभागाकडून करण्यात आली आहे.
गुरुवारी (13 मार्च) होळी आहे. त्यानिमित्ताने होळीच्या लाकडांसाठी जंगलतोड होऊ नये यासाठी वन विभागाचे गस्ती पथक मंगळवारी रात्री सुधागड तालुक्यातील पुई गावाच्या परिसरात गस्त घालत होते. अचानक गस्ती पथकाला टॉर्चचा प्रकाश दिसला. मध्यरात्रीच्या सुमारास टॉर्चचा प्रकाश दिसल्याने गस्ती पथकाचा संशय वाढला. त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली असता टॉर्चच्या प्रकाशात संशयित हालचाली होत असल्याचे त्यांना जाणवले. त्याचवेळी टॉर्च वापरणाऱ्या व्यक्तीला कुणीतरी आपल्या दिशेने येत असल्याचा संशय आल्याने त्याने बंदूक जंगलात टाकून पळ काढला.
हेही वाचा… Beed Crime : बीडवर आकांचा ठेका?
त्यामुळे वन विभागाच्या गस्ती पथकाचा संशय वाढला आणि त्यांनी पळणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग केला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. परंतु, तो अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला. वन विभागाच्या गस्ती पथकाने त्याची बंदूक जप्त करून पंचनामा केला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बंदूक टाकून पळाला म्हणजे संबंधित व्यक्ती शिकारी असू शकतो.
या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवानी शिंदे, संकेत गायकवाड, नामदेव मुंढे, विनोद चव्हाण, संदीप ठाकरे, प्रियंका तारडे (सर्व वनरक्षक), वनपाल उत्तम शिंदे यांचा सहभाग होता. तसेच लिपिक संतोष भिंगारदिवे यांचेही सहकार्य लाभले.
सापडलेली बंदूक ठासणीची
या बंदुकीचा वापर मुख्यतः शिकारीसाठी केला जातो. ही हाताने भरली जाणारी बंदूक आहे, ज्यामध्ये दारू आणि गोळी भरून ती चालवली जाते.
कठोर कारवाई केली जाईल
वनविभागातील अधिकारी व कर्मचारी डोळ्यात तेल घालून गस्त करीत आहेत त्यामुळे वनक्षेत्रात कोणीही अवैध प्रवेश करू नये किंवा शिकारीचा प्रयत्न करू नये. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– विशाल सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड, पाली
(Edited by Avinash Chandane)