पनवेल : अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तेजस्विनी पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि गौरव करताना महिलांना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पत्रकारांनी एकत्रित काम करायला हवे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात हा सोहळा झाला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर उपस्थित होते.
हेही वाचा… Pen News : पेणमधील खुशबूच्या न्यायासाठी सरसावले श्रीरामपूरचे आमदार, विधानसभेत उठवला आवाज
तेजस्विनी पुरस्काराच्या मानकरी
महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या मोनिका औचटकर, कलाक्षेत्रातील अंकिता राऊत, क्रीडा क्षेत्रातील प्रियांका गुंजाळ, हळद लागवडीतून महिलांना सेंद्रीय शेतीचा मार्ग दाखवणाऱ्या मीनल राणे, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुचिका शिर्के यांचा तेजस्विनी पुरस्काराने गौरव करण्यात आला.
हेही वाचा… Pen News : अघोरी विद्येचा डाव उधळला, पेण तालुक्यातील नाडे स्मशानभूमीत बुधवारी मध्यरात्री काय घडलं
तळागळातील कर्तृत्ववान महिलांना शोधून त्यांना प्रकाशझोतात आणण्याचे काम तेजस्विनी पुरस्काराच्या माध्यमातून अलिबाग प्रेस असोसिएशन करत आहे. याबद्दल आदिती तटकरे यांनी असोसिएशनचे कौतुक केले. तर 18 वर्षांत पुरस्कार मिळालेल्या महिलांवर पुस्तक प्रकाशित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. तसे केल्यास भविष्यात महिलांना आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले. शिवाय पोलीस अधीक्षकांनाही या उपक्रमाचे कौतुक केले.
महिलांकडे आर्थिकशक्ती
महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात 19 हजार महिला बचत गटांना 460 कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी यावेळी दिली. तसेच रायगडमध्ये 45 हजार 600 लखपती दीदी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचलन प्रफुल्ल पवार यांनी आणि आभार प्रदर्शन समीर मालोदे यांनी केले.
(Edited by Avinash Chandane)