Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडRaigad News : महाडजवळ रसायनाचा टँकर उलटला, त्यानंतर काय घडलं

Raigad News : महाडजवळ रसायनाचा टँकर उलटला, त्यानंतर काय घडलं

Subscribe

पनवेल / महाड : मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (20 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास रसायन वाहून नेणारा टँकर (आरजे-09-जीई-2217) उलटला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी केमिकलमुळे लोक भयभीत झाले आहेत. हा अपघात दासगावजवळ झाला. टँकरचालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. टँकर उलटल्यानंतर काही वेळ वाहतुकीला झळ पोहोचली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक पूर्ववत केली.

महाड एमआयडीसीकडून नाशिककडे रसायन वाहून नेणारा टँकर दासगावजवळ मध्यरात्रीच्या सुमारास उलटला. या दुर्घटनेत टँकरचालक त्याच्या केबिनमध्येच अडकला होता. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे, महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. खाडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. शिवाय महालक्ष्मी अँब्युलन्स आणि महाड अब्दा मित्र मदतीला धावले. यावेळी महाड नगरपालिका आणि एमआयडीसीमधील अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी आल्या होत्या. त्यांनी टँकरचालकाला केबिनबाहेर सुरक्षित काढले आणि महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. टँकरचालकाच्या (रामप्रसाद भोजराज गुरजर, राजस्थान) पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

हेही वाचा…  Coastal Road : 14 हजार कोटी खर्चून बांधलेल्या कोस्टल रोडवर भेगा अन् पॅच वर्क , PMO ने घेतली दखल

महाड एमआयडीसीमधील न्यू इंडिया डिटर्जंट या कंपनीतून 38 टन सल्फ्युरिक अॅसिड नाशिकला घेऊन जाताना ही दुर्घटना घडली. टँकर उलटल्यानंतर यातील रसायन गटारातून वाहून जवळच्या वस्तीत गेले. तसेच रहिवाशांच्या डोळ्यांची आगआग होऊ लागली तसेच अनेकाना श्वास घेताना त्रास होऊ लागला. या शिवाय विहिरीजवळ केमिकल साठल्याने लोक घाबरले आहेत. हे रसायन पिण्याच्या पाण्यात मिसळले तर काय होईल, याची भीती ग्रामस्थांना वाटत आहे. दरम्यान, मार्क सेफ्टी ग्रुपचे विकास सासणे, शीतल पाटील, सी. डी. देशमुख आणि आप्पासाहेब गजबार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टॅंकरला लागलेली गळती थांबवत त्या परिसरातील रहिवासांना अॅसिडमुळे होणारा त्रास आणि त्यावर उपाय यावर मार्गदर्शन केले.

(Edited by Avinash Chandane)