पनवेल : रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग आणि महामार्गावरील माणगाव बायपासचे काम पूर्ण न झाल्याने माणगाव शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. याबाबत महामार्ग प्रशासन अयशस्वी ठरल्याने रायगड प्रेस क्लब प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण करून निषेध करणार आहे. दीड दशकापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम 85 टक्के पूर्ण झाले असले तरी इंदापूर आणि माणगाव येथील बायपासचे काम रखडले आहे. परिणामी शनिवारी आणि रविवारी माणगाव ते वडपालेपर्यंत वाहतूक कोंडी होते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे महामार्गालत राहणाऱ्या जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रेंगाळल्याने वाहतुकीला वारंवार ब्रेक लागत आहे. अशातच इंदापूर आणि माणगाव येथील बायपासचे काम अजून पूर्ण न झाल्यामुळे माणगाव, इंदापूर हे वाहतूक कोंडीचे स्पॉट बनले आहेत. याचा माणगावकरांना प्रचंड त्रास होत आहे. म्हणूनच बायपासची कामे वेगाने करा आणि लोकांची त्रासातून मुक्तता करा, या मागणीसाठी एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रायगड प्रेस क्लब 26 जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहे. तसे निवेदन क्लबचे अध्यक्ष आणि मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मनोज खांबे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता यांना दिले आहे.
हेही वाचा… रायगड जिल्ह्यात सर्च बांगलादेशी मोहीम तीव्र, महाडमधून सहाजण ताब्यात
शनिवार-रविवार तसेच इतर सुट्ट्या याशिवाय वर्षभरातील महत्त्वाचे सण यामुळे माणगावपासून वडपालेपर्यंत कायम वाहतूक कोंडी होते. यामुळे माणगाव ते वडपाले हे 15 ते 20 किलोमीटर अंतरासाठी प्रवाशांचे 3 ते 4 तास खर्च होतात. इंदापूर आणि माणगावदरम्यान रखडलेल्या बायपासमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा गंभीर परिणाम माणगाव बाजारपेठेवर झाला आहे. कायमच्या वाहतूक कोंडीमुळे ग्राहक माणगाव बाजारपेठेत येण्यास नकार देत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग तसेच छोटे-मोठ्या व्यावसायिकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे उपोषणानंतरही योग्य उपाययोजना न केल्यास रायगडसह कोकणातील पत्रकार, विविध सामाजिक संघटना व्यापक आंदोलन छेडण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी महामार्ग विभागाची असेल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाची विनंती
रायगड प्रेस क्लबच्या इशाऱ्याची राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेतली आहे. माणगाव आणि इंदापूर या दोन्ही बायपासचे काम करणाऱ्या जुना कंत्राटदाराला काळ्यायादीत टाकले आहे. बायपासच्या कंत्राटासाठी नव्याने निविदा काढली असून महिनाभरात सारे सुरळीत होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पेणधील कार्यकारी अभियंत्यांनी रायगड प्रेस क्लबला कळवले आहे. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे, अशी माहिती मनोज खांबे यांनी दिली. मात्र, उपोषण मागे घेण्याचा निर्णय अजून झालेला नाही, असे खांबे यांनी सांगितले.
(Edited by Avinash Chandane)