अलिबाग : आर्थिक आरोग्य बिघडले की काय होते, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यातील कंत्राटी नर्स दोन महिन्यांपासून पगाराविना काम करत आहेत. रुग्णांना सेवा देत असताना आम्ही उपाशी राहायचं का, असा सवाल त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर पगार मिळत नसल्याने किती दिवस उधारीवर जगायचं, याकडेही त्यांनी लक्ष वेधल्याने आता जिल्हा आरोग्य विभाग सरकारकडून 40 लाखांचा निधी किती तत्परतेने मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबागमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. तसेच जिल्ह्यात रोहा, पेण, खालापूर, महाड, माणगाव, श्रीवर्धन आदी तालुक्यांमध्ये उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालये आहेत. वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ही रुग्णालये उभारली आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने येथे कंत्राटी नर्सची नियुक्ती करण्यात आली आहेत. मात्र, दोन महिन्यांपासून त्यांना पगार न मिळाल्याने आर्थिक गणित सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा… Raigad Child Marriage : कुमारी मातांचा कलंक रायगड कसा पुसणार, वर्षभरात 237 कुमारी माता
वास्तविक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कंत्राटी नर्सना पगार दिले जाते. मात्र, दोन महिन्यांपासून त्या पगाराशिवाय काम करत आहेत. खरेतर वर्षभरापासून त्यांच्या पगाराचा प्रश्न काहीसा अनियमित आहे. मात्र, दोन महिन्यांपासून पगाराची रक्कम रखडल्याने जिल्ह्यातील कंत्राटी नर्स मंडळींचे आर्थिक आरोग्य बिघडले आहे. या दोन महिन्यांसाठी त्यांना 40 लाख रुपये देणे आहे. डॉ. निशिकांत पाटील यांनी नव्यानेच जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा अतिरिक्त भार स्वीकारला आहे. त्यामुळे ते हा प्रश्न कसा सोडवणार, राज्य सरकार ४० लाखांचा निधी तातडीने देणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.
(Edited by Avinash Chandane)