म्हसळा : राज्य सरकारने वीज मीटरसाठी अदानी कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप करत म्हसळा तालुक्यातील शेकडो ग्राहकांनी अदानी स्मार्ट मीटर विरोधात मोर्चा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत विरोध केला.
अनेक कंपन्यांनी विजेसाठी स्मार्ट मीटर उपलब्ध केले आहेत. मात्र, सरकारने अदानी कंपनीला स्मार्ट वीज मीटर लावण्याचे कंत्राट दिल्याचा आरोप म्हसळ्यातील वीज ग्राहकांनी केला आहे. एवढेच नाही तर अदानी स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी म्हसळा तालुक्यातील शेकडो ग्राहकांनी मोर्चा काढला. म्हसळा तालुका संघर्ष समितीने मंगळवारी (4 मार्च) म्हसळ्यातील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. स्मार्ट मीटर सामान्य ग्राहकांना परवडणारे नाहीत असे सांगत म्हसळा महावितरण विभागाचे उप कार्यकारी अधिकारी एस. जी. पालशेतकर यांना शेकडो अर्ज देत हे मीटर आम्ही वापरणार नाही, असे सांगितले.
हेही वाचा… Raigad Accident : ताम्हणी घाटात कार – एसटीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
आज शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आमची मागणी मान्य न झाल्यास पाच हजार लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा म्हसळा तालुका संघर्ष समितीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. या मोर्चात संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर काळोखे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर, महादेव पाटील, शाहिद उकये, नईम दळवी, निकेश कोकचा, अनिल बसवत, संदीप चाचले यांच्यासह शेकडो रहिवासी सहभागी झाले होते.
(Edited by Avinash Chandane)