अलिबाग : रायगड जिल्ह्यात पहिला रोपवे प्रकल्प 1996 मध्ये किल्ले रायगडासाठी राबवण्यात आला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती तसेच दिव्यांगांना किल्ले रायगडावर जाणे सहज शक्य झाले. आता रायगड जिल्ह्यात आणि दोन ठिकाणांना रोपवे उभारण्यास मान्यता मिळाली आहे. यातील एक आहे कुलाबा किल्ला आणि दुसरा आहे श्रीक्षेत्र कनकेश्वर! नुकसाच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोपवेसाठी मंजुरी मिळाल्याने पर्यटक आणि भाविकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
अलिबाग तालुक्यातील शहरालगत मापगावमधील श्रीक्षेत्र कनकेश्वर देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवती, दिव्यागांना शक्य होत आहे. कनकेश्वराच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक येतात. मात्र, उंचीवरील देवस्थान आणि दमछाक करणाऱ्या 300 पायऱ्या यामुळे बहुसंख्य भाविक पायथ्याला नमस्कार करून परत जातात. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्याबाबतही अशीच स्थिती आहे. कुलाबा किल्ल्यातील गणपतीचे मंदिर म्हणजेच गणेश पंचायतन हे अलिबागकरांचे आराध्य दैवत मानले जाते. मात्र या किल्ल्यात आणि गणपतीच्या दर्शनासाठी ओहोटी असतानाच जाता येते. इतर वेळी किल्ल्यात जाण्यासाठी कोळी बांधवांच्या बोटी उपलब्ध असतात. मात्र,. भरती-ओहोटीची वेळ न पाळल्यास किल्ल्यात अडकण्याची भीती असते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी रोपवे बांधावे, अशी मागणी होत होती.
अलीकडेच मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील 45 देवस्थानांवर रोपवे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या राष्ट्रीय राज्य मार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजने अंतर्गत रोपवेची उभारणी करण्यात येणार आहे. यापूर्वी माथेरान आणि घारापुरी लेणी येथीही रोपवेला मान्यता मिळाली आहे. कुलाबा किल्ला, कनकेश्वर येथे तसेच माथेरानला रोपवे उभारल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल आणि पर्यटनाभिमुख अर्थव्यवस्थेला मोठे आर्थिक बळ मिळणार आहे.

भाविकांची सोय होणार
कनकेश्वर देवस्थानाला वर्षभर मोठ्या संख्येने भाविक भेट देत असतात. मात्र 300 पायऱ्यांमुळे वृद्ध, मुलांना तेथे जाणे शक्य होत नाही. कनकेश्वर रोपवेचा प्रस्ताव खूप आधी पाठवला होता. रोपवेमुळे भाविकांची सोय होणार आहे. कुलाबा किल्ल्यात जाणेही सोपे होणार आहे. – महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग-मुरुड
(Edited by Avinash Chandane)