अलिबाग : महाराष्ट्राची हिरकणी आणि जागतिक विक्रमवीर अशी ओळख निर्माण करणाऱ्या शर्विका अमृता जितेन हिने आणखी एक जबरदस्त कामगिरी केली आहे. सात वर्षांच्या या चिमुरडीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लिंगाणा हा अवघड दुर्ग सर करून 121 गड-किल्ले सर करणाऱ्या चिमुरडीचा सन्मान मिळवला आहे. शर्विकाच्या या कामगिरीमुळे तिचे रायगड जिल्ह्यात अभिनंदन होत असतानाच गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांकडूनही तिच्या साहसाचे कौतुक केले जात आहे. सह्याद्रीच्या कुशीतील या मुलीमुळे रायगडवासीयांची छाती अभिमानाने फुलून आली आहे.
हेही वाचा… Pen News : अंगणवाडीतील खाऊच्या पॅकेटमध्ये चक्क मेलेला उंदीर, अंगणवाडी सेविकेमुळे दुर्घटना टळली
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पराक्रमाची परंपरा बाळगणाऱ्या अलिबागची मुलगी असलेल्या शर्विकाला अगदी लहान असल्यापासून गिर्यारोहणाची हौस आहे. लिंगाणा हा महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग म्हणून ओळखला जातो. सह्याद्री डोंगररांगेतील पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या दुर्गम वाटेवर असलेला हा दुर्ग स्वराज्याचे कारागृह म्हणून प्रसिद्ध आहे. या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाट देखील थरारक आहे. या सर्वांवर जिद्द आणि संयमाने मात करत शर्विकाने लिंगाणाची मोहीम फत्ते केली आहे. या मोहिमेत तिच्यासोबत 16 गिर्यारोहकांचा समावेश होता.

हेही वाचा… Raigad Politics : त्या व्हिडीओत दडलंत तरी काय, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद व्हिडीओपर्यंत
कठीण गडांच्या मोहिमा यशस्वी करण्यासाठी पुण्यातील राजे शिवाजी वॉल क्लाइंबिंग या संस्थेच्या माध्यमातून अमोल जोगदंड आणि मांतू मंत्री या प्रशिक्षकांकडून शर्विका दोन वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणामुळेच तिला या मोहिमेत आत्मविश्वास मिळण्यास मदत झाली. तसेच पुण्यातील एस.एल. ॲडव्हेंचर संस्थेने एव्हरेस्टवीर लहू उघडे यांच्या सहकार्याने या मोहिमेचे आयोजन केले होते. याच संस्थेतील गिर्यारोहक तुषार आणि केदार यांच्या माध्यमातून शर्विकाने ही मोहीम विविध सुरक्षा उपकरणांच्या साहाय्याने यशस्वीपणे पूर्ण केली. लिंगाण्यासोबत शर्विकाने आतापर्यंत 121 गड-किल्ल्यावर मोहिमा पूर्ण केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(Edited by Avinash Chandane)