पनवेल : रायगड जिल्ह्यात पशुधनाची गणना सुरू असतानाच एका गूढ आजाराने 7 जनावरांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना सुधागड तालुक्यातील फणसवाडीमध्ये घडली. या गावातील सात जनावरे गुरुवारी (16 जानेवारी) दगावल्याने रायगड जिल्ह्याच्या पशूसंवर्धन विभागाने तातडीने धाव घेत माहिती घेतली.
फणसवाडी गावातील सात जनावरे एकाच दिवशी पोट फुगून मृत झाले आहेत. या आजाराचे अजून निदान झालेले नसले तरी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. विशेष म्हणजे फणसवाडीतील राजेंद्र विनायक शिंदे यांच्या आणखी दोन जनावरांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर गुरुवारी उपचार करण्यात आले आहेत. यानंतर सर्व जनावरांचे लसीकरण करणे आणि गोठ्यांमध्ये फवारणी करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत.
हेही वाचा… Panvel problem : नवीन पनवेलकर जेरीस, खोदलेले रस्ते, काँक्रिटीकरण, बांधकामे, प्रदूषणाने त्रस्त
पुण्यातून अहवाल येणार
या जनावरांचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले आहे. रोगाच्या निदानासाठी नमुने पुण्यातील रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालानंतर या आजाराचे गूढ उकलू शकेल.
हेही वाचा… Raigad News : पांढरा कांद्यामुळे शेतकऱ्यांचे उखळ पांढरे, आता फक्त आठवडाभराची प्रतीक्षा
असा होतो आजार
मृत जनावरे उघड्यावर टाकल्यानंतर इतर प्राणी या जनावराची हाडे चघळतात. त्यावेळी हाडांवरील जंतू पाळीव जनावरे गाय, बैल यांच्या पोटात जातात आणि असा आजार होतो, अशी माहिती मिळते.
एवढे कराच!
मृत जनावराची योग्य विल्हेवाट लावा, मृतदेह उघड्यावर टाकू नका, गोठा स्वच्छ ठेवून नियमित फवारणी करा, तसेच जनावरांची विष्ठादेखील कुठेही न टाकता दूरवर टाकण्याची काळजी घ्यावी.
या शेतकऱ्यांची जगावरे दगावली
- वसंत रामजी जाधव – 1
- नामदेव शिंदे – 1
- संतोष देवजी शिंगरे – 1
- वसंत धोंडू कानडे – 2
- संजय महादेव सावंत – 1
- भरत सहदेव मांडवकर – 1
(Edited by Avinash Chandane)