HomeमहामुंबईरायगडRaigad Politics : रायगडमध्ये महायुतीतून राष्ट्रवादी OUT, आमदार खासदारांच्या सत्कारातून तटकरे वजा,...

Raigad Politics : रायगडमध्ये महायुतीतून राष्ट्रवादी OUT, आमदार खासदारांच्या सत्कारातून तटकरे वजा, थोरवे विरुद्ध तटकरे वाद पेटला

Subscribe

खोपोली : रायगड जिल्ह्यातून विजयी झालेल्या महायुतीच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा सत्कार शुक्रवारी (17 जानेवारी) कर्जतमध्ये आयोजित केला आहे. मात्र, यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना वगळल्याने रायगडमध्ये महायुतीतून राष्ट्रवादी ‘आऊट’ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा सत्कार कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित केल्यामुळे थोरवे विरुद्ध तटकरे वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

महेंद्र थोरवे यांनी या संदर्भात लावलेले बॅनर आणि समाज माध्यमांवरील आमंत्रण पत्रिकेत सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांचे नाव आणि फोटो नाहीत. त्यामुळे थोरवे यांनी रायगडमध्ये तटकरे यांच्याविरोधात केलेली ही मोर्चेबांधणी असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपासूनच थोरवे विरुद्ध तटकरे यांच्यात संघर्ष सुरू होता. थोरवेंच्या विरोधात सुधाकर घारे अपक्ष म्हणून लढले असले तरी त्यांच्यामागे तटकरे होते, असा जाहीर आरोप आमदार थोरवे यांनी केला होता. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नका, अशी जाहीर भूमिका थोरवे यांनी घेतली होती. त्यामुळे थोरवे विरुद्ध तटकरे संघर्ष टोकाला गेला आहे.

आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार सुनील तटकरे

हेही वाचा…  Water Shortage : रायगडवासीयांच्या डोक्यावर यंदाही पाण्याचा हंडा, डेडलाईन संपूनही 931 योजना अपूर्ण

अशातच आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीच्या रायगडमधील विजयी आमदार-खासदारांच्या सत्कार सोहळ्याला तटकरे ‘बापलेकी’ला वगळल्याने आता त्यांच्यातील संघर्ष आणखी चिघळणार यात शंका नाही. विशेष म्हणजे आदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नये, अशी रायगडमधील शिवसेनेचे तीन आणि भाजपच्या तीन आमदारांची भूमिका असल्याचेही थोरवे म्हणाले होते. त्यामुळे हा सत्कार म्हणजे आदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नये यासाठी केलेली मोर्चेबांधणी आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. कारण दोन दिवसांत पालकमंत्रीपदाची घोषणा केली जाईल, अशी चर्चा आहे.

या सत्कार सोहळ्यात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. तर प्रकाश आबिटकर या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत.

(Edited by Avinash Chandane)