पनवेल : कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबागमध्ये क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे यांच्यावर टिकेची चौफेर फटकेबाजी दोन दिवसांपूर्वी केली होती. एवढेच नाही तर ‘सुतारवाडीचा औरंगजेब’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता खासदार सुनील तटकरे यांच्या समर्थनार्थ कर्जतमधून सुधाकर घारे सरसावले आहेत. फक्त 10 दिवस थांबा, कोणाकडे किती जमीन आहे, किती जागा खरेदी केली, पोलीस अधिकाऱ्यांच्या कशा बदल्या केल्या हे सर्व पुराव्यानिशी सादर करणार आहे, असे म्हणत घारे यांनी नाव न घेता थेट आमदार महेंद्र थोरवे यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी थोरवे विरुद्ध घारे असा सुरू झालेल्या संघर्षाला पुन्हा नवीन धार मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा… Pen News : पेणमधील खुशबूच्या न्यायासाठी सरसावले श्रीरामपूरचे आमदार, विधानसभेत उठवला आवाज
सुधाकर घारे यांनी शुक्रवारी कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेत न घेता महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता टीकेचे अस्त्र सोडले आहे. बीड आणि बिहारलाही लाजवेल असा आका कर्जत-खालापूरमध्ये आहे, अशी कठोर टीका घारे यांनी केली. त्यांनी लोकांवर कसे अन्याय केले, कुणाला दमदाटी केली याचे पुरावे, 2019 पासून कुणाला फोन केले यांची माहिती घेतली आहे. त्याचवेळी सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्याची तुमची उंची नाही, असेही घारे यांनी सुनावले आहे.
हेही वाचा… Pen News : अघोरी विद्येचा डाव उधळला, पेण तालुक्यातील नाडे स्मशानभूमीत बुधवारी मध्यरात्री काय घडलं
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, महायुतीकडून उमेदवारी शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांना मिळाल्याने दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरूच होते. त्यातच थोरवे विरुद्ध तटकरे अशाही चकमकी सुरू होत्या. तटकरे यांचे कट्टर समर्थक असलेले सुधाकर घारे यांनी अखेर स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ केला. अटीतटीच्या लढतीत महेंद्र थोरवे पाच-साडेपाच हजारांच्या फरकाने विजयी झाले. यातूनच सुधाकर घारे यांची राजकीय ताकद दिसून आली. खासदार सुनील तटकरे यांच्यावर आमदार थोरवे यांनी टिकेची तोफ डागताच तेच सुधाकर घारे तटकरेंसाठी छातीचा कोट करून पुढे आले आहेत.
(Edited by Avinash Chandane)