HomeमहामुंबईरायगडRaigad Politics : महेंद्र थोरवे यांची आमदारकी राहणार की जाणार, सुधाकर घारे...

Raigad Politics : महेंद्र थोरवे यांची आमदारकी राहणार की जाणार, सुधाकर घारे यांच्या याचिकेत काय दडलंय

Subscribe

पनवेल : कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता याच सुधाकर घारे यांनी थेट महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायालयाने 29 जानेवारी रोजी स्वीकारली असून यावर पहिली सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मतदारसंघात असलेली लढाई आता थेट न्यायालयात गेली आहे. परिणामी न्यायालयात काय होणार याकडे कर्जत मतदारसंघासह संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावर मी आमदार म्हणून काम करत राहणार, अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

हेही वाचा…  Alibag diesel Taskari : सीसीटीव्ही असूनही डिझेल तस्करी कशी होते, स्थानिक पोलिसांच्या अंकुशावर प्रश्नचिन्ह

नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्र थोरवे कर्जत मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी सुधाकर घारे यांचा साडेपाच हजारांहून अधिक मतांनी म्हणजे काठावर पराभव केला आहे. मात्र, या निवडणुकीत महेंद्र थोरवे यांनी लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली, चुकीची पद्धत वापरली, डमी उमेदवार उभे केले असे आरोप करत आमदार थोरवे यांना अपात्र करा, अशी मागणी उच्च न्यायालयात केली आहे. यासाठी गेल्या महिन्यात याचिका दाखल केली होती. ती याचिका दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने स्वीकारली आहे. या संदर्भात काही पुरावेही घारे यांनी याचिकेसोबत सादर केले आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जिल्ह्यासह राज्यात गाजली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सुधाकर घारे यांना उमेदवारी मिळण्याची खूप अपेक्षा होती. मात्र, महायुतीत ही जागा विद्यमान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांना सुटली होती. त्यामुळे सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ करत अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेकडून महेंद्र थोरवे, शिवसेना उबाठाकडून नितीन सावंत आणि सुधाकर घारे अपक्ष म्हणून रिंगणात होते. ही निवडणूक तिरंगी होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात थोरवे आणि घारे यांच्यात अटीतटीची लढत झाली. आणि थोरवे यांचा निसटता विजय झाला. तर ठाकरे गटाचे नितीन सावंत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते.

कोर्टाने याचिका स्वीकारली

आमदार महेंद्र थोरवे यांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. एका ईव्हीएमच्या मतांची मोजणी झाली नाही, हाही मुद्दा यात आहे.
– सुधाकर घारे, याचिकाकर्ते

याचिकेबद्दल माहीत नाही

मी निवडून आलो आहे आणि आमदार म्हणून माझं काम करत राहणार. याचिकेबद्ल मला ठावूक नाही.
– महेंद्र थोरवे, शिवसेना आमदार, कर्जत मतदारसंघ

(Edited by Avinash Chandane)