Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडRaigad Politics : औरंगजेब ते गद्दारीची पिल्लावळ, थोरवे विरुद्ध तटकरे सामन्यात आरोपांचे चौकार आणि षटकार

Raigad Politics : औरंगजेब ते गद्दारीची पिल्लावळ, थोरवे विरुद्ध तटकरे सामन्यात आरोपांचे चौकार आणि षटकार

Subscribe

पनवेल : रायगड जिल्ह्यात कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील दुष्मनी जगजाहीर आहे. त्यातच पालकमंत्रिपदाचा वाद झाल्याने जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातून विस्तवही जात नाही. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांचा सुतारवाडीत बसलेला आजचा औरंगजेब, असा बुधवारी (5 मार्च) जाहीर उल्लेख केल्यामुळे वाढलेल्या पाऱ्यासोबत राजकारणही तापले आहे. यानंतर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदार थोरवे गद्दार असल्याचा पलटवार केला आहे. एवढेच नाही तर थोरवे यांनी लायकीच्या पलीकडे जाऊन टीका केल्याचा घणाघातही अनिकेत तटकरे यांनी केला आहे.

हेही वाचा…  Navi Mumbai News : नवी मुंबईत सापडल्या बारावीच्या उत्तरपत्रिका, तुमच्या मुलांनी बारावीची परीक्षा दिली आहे का

सुतारवाडीतील औरंगजेब

अलिबागमधील एका क्रिकेटच्या सामन्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी बुधवारी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी थेट खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकेचे अस्त्र डागले. आजचा औरंगजेब सुतारवाडीत बसलेला आहे, अशी जहरी टीका करतानाच चुकीच्या पद्धतीने आमच्याशी राजकारण खेळाल तर लक्षात ठेवा, असा सज्जड दमदेखील आमदार थोरवे यांनी भरला आहे. त्याचवेळी भरतशेठ यांनी आशीर्वाद दिला तर पुढच्यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवू, असा इशाराही थोरवे यांनी दिला आहे. त्यामुळे रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

सगळंच मला कशाला?

माणगावमधील क्रिकेटच्या सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी कॅप्टन कूल असतो, अशी टीका केली होती. तो संदर्भ घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर पलटवार केला. धोनी कॅप्टन कूल होता. त्यांच्यासोबत असलेले खेळाडूही चांगले होते. म्हणून धोनीला प्रत्येकवेळी विजय संपादन करता आला. म्हणून खेळाडूंनाही तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. नुसतेच कॅप्टन असून चालत नाही. इथे मुलगीही माझीच खेळाडू, मुलगाही माझाच खेळाडू, रायगड जिल्ह्यात सगळेच मला मिळाले पाहिजे, असे होणार नाही, अशी बोचरी टीका थोरवे यांनी केली. एवढेच नाही तर पंचांनी निर्णय दिला असला तरी आता थर्ड अम्पायरने निर्णय चुकीचा ठरवून स्थगिती दिली आहे, असेही सुनावले.

थोरवे गद्दारीची पिल्लावळ

आमदार महेंद्र थोरवे यांच्या टिकेनंतर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी थोरवेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर ही कालची गद्दारीची पिल्लावळ असून त्यांना जशास तशाच उत्तरे देऊ, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी आदिती तटकरे यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अनिकेत तटकरे यांनी केला. 6 नोव्हेंबर 2024 रोजीचा फोटो दाखवत यात आमदार थोरवे यांचे पीए सचिन पाटेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर आणि तत्कालीन शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीवर्धनमधील उमेदवारअनिल नवगणे होते, याकडे अनिकेत तटकरे यांनी लक्ष वेधले.

(Edited by Avinash Chandane)