अलिबाग : रोहेकरांनी आवाज उठवताच अवघ्या चार दिवसांत रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँकेच्या इमारत आणि जागेच्या विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी व्यवहार रद्दबातलचा आदेश काढताच रोहेकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँकेची इमारत आणि जमिनीचा बाजारभाव 4 कोटी रुपये असताना हा व्यवहार अवघ्या 1 कोटी 10 हजार रुपयांत करण्यात आला. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आचारसंहितेच्या काळात हा व्यवहार झाल्याचे फार उशिरा उघडकीस आले.
हा व्यवहार 6 जानेवारी रोजी पूर्ण झाल्यानंतर रोह्यात खळबळ उडाली. या व्यवहाराला लगेचच स्थगिती द्यावी आणि नंतर व्यवहार रद्द करावा, अशी मागणी पाच दिवसांपूर्वी रोहेकरांनी केली. समीर शेडगे,अमित घाग आणि नितीन परब यांनी पत्रकार परिषद घेत रोह्याच्या अस्मितेला हात घातला. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगून मंत्री आदिती तटकरे आणि त्यांचे इतर सहकारी लवकरच सहकार मंत्र्यांना स्थगितीसाठी पत्र देतील, असेही सांगितले होते.
हेही वाचा… Raigad News : चिमुरड्या शर्विकाची पाऊले लिंगाण्यावर, 121 गड सर करणारी अलिबागची कन्या
त्याप्रमाणे आदिती तटकरे यांनी सहकारमंत्र्यांना रोहेकरांच्या वतीने स्थगितीसाठी अर्ज दिला होता. त्याची दखल घेत या मालमत्तेची निविदा प्रक्रिया रद्द करुन फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांनी त्यांच्या स्तरावर करावी, असे निर्देश अवर सचिव मंजुषा साळवी यांना दिले. त्यानंतर मंजुषा साळवी यांनी व्यवहार रद्द केल्याचा आदेश काढला.
1 जानेवारी 1947 रोजी स्थापन झालेली रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँक रोह्याची अस्मिता होती. पण, कर्जदारांमुळे आर्थिक संकटात सापडून 2007 मध्ये बँक बुडीत निघाली. हजारो ठेवीदार, सभासदांचे तब्बल 20 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. असे असताना रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँकेच्या मुख्यालयाच्या विक्रीची निविदा प्रक्रिया 4 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झाली आणि 23 ऑक्टोबर रोजी प्रक्रिया झाली. त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. अशातच 4 कोटींचे मूल्य असलेली इमारत व जागा अवघ्या 1 कोटी 10 हजारांना एकमेव निविदा असलेल्या बिल्डरला विकण्यात आली. हा व्यवहार जानेवारीत पूर्ण झाला. रोहा अष्टमी अर्बन बँकेचे 12 हजारांहून अधिक सभासद आहेत.
(Edited by Avinash Chandane)