Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडShrivardhan News : श्रीवर्धन नगरपरिषद लवकरच होणार स्मार्ट, अनेक कामात अव्वल कामगिरी

Shrivardhan News : श्रीवर्धन नगरपरिषद लवकरच होणार स्मार्ट, अनेक कामात अव्वल कामगिरी

Subscribe

श्रीवर्धन : स्मार्ट नगरपरिषदेचा मान लवकरच श्रीवर्धनला मिळेल, असा आशावाद महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकताच व्यक्त केला. श्रीवर्धन शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या प्रक्षेपणाचा लोकार्पण सोहळा अलीकडेच झाला. यावेळी त्यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या कामाचे कौतुक केले. तसेच भविष्यात श्रीवर्धनमध्ये तारांगण उभारण्याची घोषणा आदिती तटकरे यांनी केली आहे. तसे झाल्यास पर्यटकांसाठी श्रीवर्धन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकेल. सीसीटीव्ही लोकार्पण खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीवर्धन शहरासह समुद्रकिनाऱ्यावर सीसीटीव्हीची नजर आहे. त्याचा कन्ट्रोल श्रीवर्धन नगरपरिषद आणि श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आहे. यापूर्वी श्रीवर्धनमध्ये सीसीटीव्ही होते. मात्र, 2020 च्या निसर्ग वादळात या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे 1.93 कोटींची मंजुरी मिळवून नव्याने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

हेही वाचा…  Raigad News : दौलतगडावर संकष्टीला गणेश दर्शन, स्वच्छता मोहिमेत आढळली पुरातन गणेशमूर्ती

धूपप्रतिबंधक बंधारा

संपूर्ण ७५२ किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवर केवळ श्रीवर्धन समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक सुशोभीकरण केलेला बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्यावर मच्छीमार, होडी, त्याचप्रमाणे खेकडा आणि कोळंबी यांच्या प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत. तसेच सेल्फी पॉईंटदेखील बनवण्यात आले आहेत. धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती विद्युत रोषणाई केलेली असून बसण्यासाठी सुशोभित अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक शोभेची झाडे देखील लावण्यात आलेली आहेत. दर शनिवार-रविवारी सायंकाळी श्रीवर्धन समुद्रकिनारी मराठी-हिंदी गाण्यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

स्वच्छ-सुंदर शहर

समुद्रकिनारा स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल असून या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह एक यांत्रिक गाडी कचरा उचलण्याचे काम करते. समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपरिषदेने जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच शहरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सकाळ, संध्याकाळ घरोघरी फिरत असतात. या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. त्यामुळे श्रीवर्धन शहर नेहमीच स्वच्छ दिसते. श्रीवर्धन नगरपरिषदेला स्वच्छता अभियानात आणि माझी वसुंधरा अभियानात अनेक बक्षिसे मिळाली आहेत.

श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था देखील उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी सांडपाणी साचलेले दिसत नाही. श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलवाहिन्या गेल्या वर्षी टाकण्यात आल्या आहेत. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प देखील कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्यामुळे श्रीवर्धन शहराला आणि पर्यटकांना शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. भविष्यात श्रीवर्धन बाजारपेठेतील जुनी तहसील कार्यालयाची इमारत पाडून त्याजागेवर शिवरायांचा मोठा अश्वारुढ पुतळा उभारून शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व सोयी-सुविधांमुळे श्रीवर्धन नगरपरिषद लवकरच स्मार्ट नगरपरिषद म्हणून ओळखली गेल्यास आश्चर्य वाटू नये.

(Edited by Avinash Chandane)