पनवेल : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने रायगडमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये आहेत. ते राज्यात परतल्यावर त्यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप भाजपमध्ये जातील, असे सांगितले जाते. मात्र, ही सर्व चर्चा कार्यकर्त्यांच्या पातळीवरील आहे, माझी अशी कोणाशीही चर्चा झाली नाही, अशी स्पष्ट भूमिका स्नेहल जगताप यांनी आपलं महानगरशी बोलताना स्पष्ट केली. त्यामुळे महाड-पोलादपूर मतदारसंघात खरंच काही घडामोड घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्नेहल जगताप यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे भरत गोगावले यांच्याविरोधात निवडणूक लढवून तब्बल ९१ हजार २३२ मते मिळवली होती. त्यांनी गोगावले यांना जोरदार लढत दिली. भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेंना साथ दिली तेव्हा महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दोन वर्षांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप यांनी दाखवून दिली. मात्र, आता त्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने ठाकरे गटाला रायगडमध्ये पुन्हा मोठा धक्का बसू शकतो. त्याचवेळी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्याविरोधात स्नेहल जगताप हा मोठा मोहरा मिळाल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
स्नेहल जगताप यांची भूमिका काय?
काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल जगताप सुसंस्कृत नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या महाडच्या नगराध्यक्ष असताना त्यांनी धडाडीने केलेले काम सर्वांच्या आजही स्मरणात आहे. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश गेला. आता त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने त्या अस्वस्थ झाल्या आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी अशी चर्चा सुरू झाली, हे सर्वात वाईट असल्याचे त्यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. माझी भाजपच्या कोणत्याची नेत्याशी ना चर्चा झाली ना बैठक झाली. त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार ही चर्चा, अचानक कशी सुरू झाली माहित नाही. मला मत देणाऱ्या कार्यकर्त्यांची कामे व्हावीत यासाठी कार्यकर्ता पातळीवर भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. यात माझा काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आमची ‘मातोश्री’वर बैठक झाली. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या चुकीच्या असल्याचे स्नेहल जगताप यांनी सांगितले.
(Edited by Avinash Chandane)