HomeमहामुंबईरायगडUran News : शेवा ग्रामस्थांचे पुनर्वसन 3 महिन्यांत, संघर्षकथा ऐकून केंद्रीय मंत्री...

Uran News : शेवा ग्रामस्थांचे पुनर्वसन 3 महिन्यांत, संघर्षकथा ऐकून केंद्रीय मंत्री काय म्हणाले

Subscribe

उरण : रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने 40 वर्षांपासून जेएनपीटी (आताचे जेएनपीए) मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनेल बंद आंदोलन पुकारले होते. गावकऱ्यांनी पाण्यात उतरून त्यांचा राग व्यक्त केला. या आंदोलनात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. या आंदोलनाची दखल घेत जलवाहतूक, पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी त्यांची पवईमध्ये भेट घेतली आणि तीन महिन्यांत अन्याय दूर करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे शेवा ग्रामस्थ सुखावले आहेत.

जेएनपीटीने प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गावाला विस्थापित केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले. चार दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत. त्याचाच भाग म्हणून चॅनेल बंदचे आंदोलन पुकारले होते.

हेही वाचा… Khopoli News : बेकायदा होर्डिंग्जविरोधात खोपोली नगरपरिषद आक्रमक, थेट कारवाईचा इशारा

शेवा ग्रामस्थांची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा

त्यानंतर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पवईतील वेस्टिनमध्ये आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व रमेश कोळी, नंदकुमार पवार, अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे, आगरी समाज नेते जयेंद्र खुणे आणि मार्शल कोळी यांनी केले. या बैठकीस रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे, एसडीओ पनवेल पवन चंदक, तसेच जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ आदी उपस्थित होते.

मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या 40 वर्षांच्या संघर्षाची कथा ऐकली आणि सगळे स्तब्ध झाले. त्यानंतर मंत्र्यांनी आंदोलकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. एवढेच नाही तर मंत्री आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया 3 महिन्यांत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी चॅनेल बंद आंदोलन स्थगित केले आणि सर्वांचे आभार मानले. या चॅनेल बंद आंदोलनात नवी मुंबई पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आंदोलन शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे आंदोलन सुरळीत पार पडले आणि शेवा ग्रामस्थांच्या मागण्यांना सकारात्मक दिशा मिळाली.

(Edited by Avinash Chandane)