Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडWater Shortage : रायगडकरांच्या घशाला यंदाही कोरड, जलजीवनच्या 931 योजना अपूर्ण, पाण्याची बोंबाबोंब सुरूच

Water Shortage : रायगडकरांच्या घशाला यंदाही कोरड, जलजीवनच्या 931 योजना अपूर्ण, पाण्याची बोंबाबोंब सुरूच

Subscribe

पनवेल : फेब्रुवारी अखेरपासून रायगडमध्ये उन्हाचा कडाका वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. कारण अजून 931 जलजीवन मिशन योजना पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकांकडून पाण्याची बोंबाबोंब सुरू झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा 50 टक्क्यांवर आल्याने आणि बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेतला तर आतापासूनच रायगडकरांच्या घशाला कोरड पडली आहे.

रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतील एकूण 1 हजार 497 कामे सुरू होती. यातील केवळ 465 पाणी योजनांची कामे पूर्ण झाली असून 931 योजनांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. निकृष्ट कामे, अर्धवट कामे आणि बिले थकल्याने कंत्राटदारांना कामे बंद केल्यामुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे रखडली आहेत. त्यामुळे यंदाही रायगडच्या ग्रामीण भागाला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यांनी पाणीटंचाई आराखडे सादर करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा… Pen Crime News : पेण तालुक्यातील दूरशेत बनतोय क्राईम स्पॉट, यावेळी सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

रायगड जिल्ह्यात एकूण 28 लहान-मोठी धरणे आहेत. त्यात सध्या केवळ 53 टक्के जलसाठा आहे. मात्र, उद्योग तसेच नागरी विभागांचा विचार केल्यास आणि त्याचवेळी सूर्याचा कोप पाहून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेतल्यास जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत रायगडवासीयांचे जलसंकट तीव्र होणार आहे.

महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील रानीवली धरणात अवघा 22 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर भाजप आमदार रविंद्र पाटील यांच्या पेण-सुधागड मतदारसंघातील ढोकशेत धरणात केवळ 18 टक्के पाण्याचा साठा आहे. 28 पैकी सहा धरणांमध्ये जेमतेम 21 ते 40 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीण रायगडला डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. कंत्राटदारांची 60 कोटींची बिले न दिल्याने त्यांनी जलजीवन योजनांची कामे थांबवली आहेत किंवा या योजनांचा वेग कमी केला आहे. त्यामुळे या योजना अपूर्ण असल्याचे कळते.

पोलादपूरचा दीड कोटीचा आराखडा

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पोलादपूर तालुक्यासाठी 1 कोटी 47 लाखांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यातून 76 गावे, 134 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. पोलादपूर हा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा मतदारसंघ आहे.

खालापूर तालुक्याला टंचाईची झळ

शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील 13 गावे आणि 28 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीने 22 लाख 25 हजारांचा पाणीटंचाई आराखडा मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. वास्तविक हा तालुका धरणांचा म्हणून ओळखला जातो. शिवाय बारमाही वाहणारी नदीदेखील आहे. तरीही फेब्रुवारीपासूनच दरवर्षी पाणीटंचाईला सुरुवात होते.

3 मार्च रोजी मोर्चा

अलिबाग तालुक्यातील रांजणखार-डावली ग्रामस्थांनी 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला होता. या गावात जानेवारी 2022 मध्ये सुरू केलेली जलजीवन योजना अजून पूर्ण झालेली नाही शिवाय गावात पाणीपुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

(Edited by Avinash Chandane)