अलिबाग : रायगड जिल्ह्याला राजकारणाची 24 तास चालणारी भट्टी मानली जाते. जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर बहुतांश नेत्यांचा राजकारण हाच मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत रायगडमधील राजकारणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि रायगडच्या मातीतला शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकाप आज साईडट्रॅक झाल्याचे दिसून येते.
हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : …तर भाजपामध्ये जाण्यासाठी मी मोकळा; एकनाथ खडसे स्पष्टच बोलले
देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये झाली. तेव्हापासून अगदी 2019 पर्यंत एकूण 17 लोकसभा निवडणुका झाल्या. रायगडमधील याचा आढावा घेतला तर 17 पैकी तब्बल 8 निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. तर सहा निवडणुकांमध्ये शेकापने विजय मिळवला. 1952 ते 1984 या कालावधीतील 8 निवडणुकांत काँग्रेस आणि शेकाप आलटून-पालटून विजयाचा झेंडा रोवत होते. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. काँग्रेसचे बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी तर 1989, 1991 आणि 1996 असे सलग तीनवेळा खासदार होऊन विजयाची हॅट्रिक केली. रायगड जिल्ह्यात अंतुले यांच्यानंतर कुणालाही विजयाची हॅट्रिक करणे शक्य झाले नाही.
2008 मध्ये लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली. यात रायगड जिल्ह्याचे दोन मतदारसंघांमध्ये विभाजन झाले. पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड हे विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात राहिले तर पनवेल, उरण आणि कर्जत हे तीन मतदारसंघ मावळ मतदारसंघाला जोडले गेले. त्यानंतर रायगडमधील राजकीय समीकरणे बदलली.
शिवसेनेचे अनंत गीते यांनी सलग दोनवेळा तर 2019 मध्ये प्रथमच सुनील तटकरे यांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड लोकसभा मतदारसंघातून दिल्लीत प्रतिनिधीत्व मिळाले. तर मावळचा खासदार आता पुणे जिल्ह्यातून येतो. त्यासाठी पनवेल, उरण आणि कर्जतमधील एकाही उमेदवारीला गेल्या तीन निवडणुकांमध्ये संधी मिळाली नाही.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस रायगडच्या नकाशावरून कधी लूप्त झाला हे कळले नाही, तर बालेकिल्ला असलेला शेकाप आब राखून असला तर त्यातील संख्यात्मक घट सर्वांचे लक्ष वेधून घेते. रायगडमधून विधानसभेत गेलेल्या सातपैकी एकही आमदार शेकापचा नाही. जयंत पाटील विधानपरिषेदत शेकापचे प्रतिनिधीत्व करतात, यातून शेकापची आजची राजकीय स्थिती लक्षात येते. तर रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा ना विधानसभेत ना विधानपरिषदेत प्रतिनिधी आहे. त्यामुळे आठवेळा खासदार देणारा काँग्रेस आणि सहावेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या शेकापची रायगडमधील वाट बिकट झाली म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
कुलाबा ते रायगड लोकसभा मतदारसंघ
आताचा रायगड जिल्हा हा कुलाबा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाचे नाव कुलाबा होते. बॅ. ए. आर.अंतुले यांनी 1981 मध्ये कुलाबा जिल्ह्याचे नाव रायगड केले. त्यानंतर 1984 च्या लोकसभा निवडणुकीत कुलाबा लोकसभा मतदारसंघाचेही नाव रायगड लोकसभा मतदारसंघ असे झाले.
रायगड/कुलाबा लोकसभा मतदारसंघाचा लेखाजोगा
1952 – सी.डी. देशमुख – काँग्रेस
1957 – राजाराम राऊत – शेकाप
1962 – भास्कर दिघे – काँग्रेस
1967 – डी. के. कुंटे – शेकाप
1971 – शं. बा. पाटील – काँग्रेस
1977 – दि. बा. पाटील – शेकाप
1980 – ए. टी. पाटील – काँग्रेस
1984 – दि. बा. पाटील – शेकाप
1989 – बॅ. ए. आर. अंतुले – काँग्रेस
1991 – बॅ. ए. आर. अंतुले – काँग्रेस
1996 – बॅ. ए. आर. अंतुले – काँग्रेस
1998 – रामशेठ ठाकूर – शेकाप
१९९९ – रामशेठ ठाकूर – शेकाप
2004 – बॅ. ए. आर. अंतुले – काँग्रेस
2009 – अनंत गीते – शिवसेना
2014 – अनंत गीते – शिवसेना
2019 – सुनील तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस