Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईRaj Thackeray : महिला दिन माँ जिजाऊंच्या नावाने ओळखला जावा, राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

Raj Thackeray : महिला दिन माँ जिजाऊंच्या नावाने ओळखला जावा, राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

Subscribe

महिला दिन खरंतर जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चिंचवड येथे मनसेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पुणे : महिला दिन खरंतर जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चिंचवड येथे मनसेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना महिला दिनाबाबतचा एक हास्यास्पद किस्सा सांगत महिला दिनाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर आपल्याकडे दोन पुरुष आले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. अरे यात महिला कुठे आहे. मागचा पुढचा विचार नाही, बस शुभेच्छा, असेही म्हटले आहे. (Raj Thackeray expressed feeling that Women’s Day should be known as Maa Jijau)

वर्धापन दिन सोहळ्यातील भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, कालच महिला दिन झाला. दरवर्षी 8 मार्चला महिला दिन सुरू करतो. काल मला एकाने विनोद पाठवला. म्हणे 21 जून सर्वात मोठा दिवस समजला जातो. हे सर्व खोटं आहे. 21 जून सर्वात मोठा दिवस नाही. तर महिला दिन सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो 8 मार्चला सुरु होतो आणि पुढच्या वर्षी 7 मार्चला संपतो. ज्यांची लग्न झाली असेल त्यांना कळत असेल मी काय म्हणतो, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. तर, आपल्याकडे दोन पुरुष आले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. अरे यात महिला कुठे आहे. मागचा पुढचा विचार नाही, बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा देतो, असेही यावेळी राज ठाकरेंनी म्हटले.

हेही वाचा… Raj Thackeray : गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार, आज केवळ…; वर्धापन दिनातून ठाकरेंचा महत्त्वाचा संदेश

यावेळी त्यांनी जिजाऊंविषयी भावना व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, महिला दिनादिवशी आपल्याला एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडतो. आपण त्या महिलेला विसरतो. हा महिला दिन खरंतर जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे. लहान असताना वडील मुघलांकडे चाकरी करतात हे ज्या मुलीला पाहवले नाही, लग्न झाल्यावर आपला पती कुठे तरी मुघलांकडे चाकरी करतो हे त्या स्त्रीला पाहवले नाही, तिने आपल्या पतीला बंड करायला लावले, जिच्या मनात सुरुवातीच्या मनात स्वराज्य ही गोष्ट पहिल्यापासून होती, तिने आपल्या मुलाकडून स्वराज्य घडवून आणले. या सर्व इतिहासाच्या मागे एका स्त्रीचे मन होते. एका महिलेचे मन होते. ते आपण विसरतो, असे राज ठाकरे म्हणाले.

तर, आज महाराष्ट्रात इतक्या महिला होऊन गेल्या. देशातील पहिली डॉक्टर महिला आनंदीबाई जोशी या महाराष्ट्राच्या होत्या. पण आपल्याला या सर्व महिलांचा विचार येतो का? आपण त्यांचा विचार करतो का? इतक्या महिलांचे योगदान आहे खासकरून महाराष्ट्रातून. इतिहासातील पुढारलेल्या स्त्रीया पाहिल्या तर त्या महाराष्ट्रात मिळतील, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनाविषयी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.