मुंबई : मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं गरजेचं नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे,” असे विधान त्यांनी केले. याचे पडसाद आता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले आहेत. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील टीका केली आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत म्हटले की, असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात, हे जरूर लक्षात ठेवावे, असे म्हणत फैलावर घेतले आहे. (Raj Thackeray MNS on RSS Bhaiyyaji Joshi statement of Mumbai Marathi)
हेही वाचा : Eknath Khadse : शाळांसाठी पैसे नाहीत, मग कशाच्या जोरावर घोषणा जाहीर करता? खडसे संतापले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, “देशाची झालेली भाषावार प्रांत रचना तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेले बलिदान या सगळ्याबद्दल भैय्याजी जोशी यांना माहीत नसेल असे अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचे कारण काय? भैय्याजी जोशी यांनी अशीच विधाने बंगळूरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावीत,” असे आव्हान त्यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का?, असा सवालदेखील त्यांनी केला. “उद्या समजा, संघाच्या तर सोडाच इतर कोणत्याही जबाबदार व्यक्तीने असे विधान जर इतर राज्यात केले असते तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का?” असा सवाल त्यांनी भाजपला केला.
“सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या विधानातून समोर येत आहे. हे काय चालेल आहे हे न समजण्याइतपत मराठी जनता दुधखुळी नाही, हे जोशींनी लक्षात घ्यावे. हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचे भान पण जोशींनी सोडावे?” असे म्हणत राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. “आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला. त्याचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन हा देखील इथे येऊन मराठीमध्ये बोलून गेला. त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईमध्ये कोणती भाषा चालते? आणि ही मुंबई कोणाची आहे? हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये?” अशा शब्दात त्यांनी जाब विचारला आहे. ते पुढे म्हणाले की, “या असल्या काड्या घालून (अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे शक्य नाही) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे. बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच. “महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावे,” असे म्हणत इशारा दिला आहे.