मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज, मंगळवारी सादर केला. हा अर्थसंकल्प 74427.41 कोटी रुपये आकारमान असलेला, मुंबईकरांना अधिकाधिक सेवासुविधा, नवीन प्रकल्प, योजना, विकासकामे देणारा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर आता माजी विरोधी पक्षनेते व माजी नगरसेवक रवी राजा यांनी वक्तव्य केले आहे. (Ravi Raja reaction to Mumbai Municipal Corporation budget)
रवी राजा यांनी ट्वीट करताना म्हटले की, मुंबई महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. तब्बल 75000 करोड रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प विकासाभिमुख आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवताना देखील कुठलीही करवाढ महापालिका प्रशासनाने सुचवलेली नाही याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – BMC Budget 2025 : मुंबई मनपाचा 74427.41 कोटींचा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प
मुंबई महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला. ७५००० करोड रुपयांचा हा अर्थसंकल्प असून, हा अर्थसंकल्प विकासाभिमुख आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प राबवताना देखील कुठलीही करवाढ महापालिका प्रशासनाने सुचवलेली नाही याबद्दल त्यांचं अभिनंदन.…
— Ravi Raja (@raviraja60) February 4, 2025
रवी राजा म्हणाले की, मुंबई महापालिकेने हाती घेतलेला कोस्टल रोड प्रकल्प हा जवळपास पूर्ण होत आला आहे आणि त्याचा लाभ मुंबईकर घेत आहेत. त्याशिवाय गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड, लिंक रोडवरून दहिसरला जोडणारा एलिव्हेटेड रस्ता असे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प महापालिकेने हाती घेतले आहेत. यातील काही प्रकल्पांची कामं सुरू आहेत, तर काही लवकरच सुरू होतील.
हेही वाचा – BMC FD : पालिकेच्या राखीव निधीत घट कायम, मुदत ठेवी 92 हजार कोटींवरून 81 हजार कोटींवर
पुढील 5 वर्षांसाठी या प्रकल्पांसह इतर प्रकल्पांसाठी 2 लाख 32 हजार करोड रुपयांच्या वर्क ऑर्डर्स दिल्या आहेत. पण यात एकच चिंतेची बाब म्हणजे, इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी जो निधी लागणार आहे, तसे उत्पन्नाचे स्रोत मुंबई महापालिकेकडे नाहीत. महापालिका या प्रकल्पांसाठी जवळपास 40 हजार करोड रुपयांच्या एफडी वापरणार आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर जर एफडी वारपल्या गेल्या आणि एखादी मोठी आपत्ती आली तर महापालिका या आपत्तीला तोंड देण्यासाठी पैसा कसा उपलब्ध करेल? याचा विचार महापालिका प्रशासकांनी करावा. ही गोष्ट सोडल्यास महापालिकेचे बजेट हे उत्तम आणि विकासाभिमुख आहे, असे रवी राजा यांनी म्हटले.