मुंबई – घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे, असे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरविरोधकांकडून जोरदार हल्लाबोल होत आहे. त्यानंतर भय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या विधानामुळे गैरसमज झाला आहे, असे वाटते. महाराष्ट्राची भाषा मराठी आणि मुंबई महाराष्ट्राचाच भाग असल्याचा खुलासा भय्याजी जोशी यांनी केला आहे.
भय्याजी जोशींचे स्पष्टीकरण
भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे मुंबईची भाषा मराठी आहे याबाबत दुमत असण्याचे काही कारण नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
ते म्हणाले की, भारताची एक विशेषता आहे, येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळेच भारत हा जगासमोर आदर्श उदाहरण आहे. मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत. आणि ते परस्परांमध्ये स्नेहबंधासह राहात आहेत. स्वाभाविकपणे आमची सर्वांची अपेक्षा असते की, बाहेरुन येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकायला पाहिजे. मराठी ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासाी असंच आमचं म्हणणं आह. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते भय्याजी जोशी
राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सदस्य आणि माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईतील विद्यानगर येथे झालेल्या कार्यक्रमात, ‘मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे. मुंबईत शहरात विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे,’ असे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनातही पडले. विरोधकांनी भय्याजी जोशी यांच्या माफीची मागणी केली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजप आणि संघाचा डाव आहे, असा आरोप केला.