मुंबई : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्यानंतर आता राजकीय नेतेमंडळींना वेध लागले आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या म्हणजे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, मीरा भाईंदर, नागपूर यांसारख्या महापालिकेच्या निवडणुका अद्यापही झालेल्या नाहीत. परंतु, यंदाच्या वर्षी या निवडणुका पार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यासाठी कंबर कसण्यात आली असून पक्षाने या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. (Sanjay Raut says Thackeray group has come to organize determination camp for municipal elections)
महापालिकेच्या निवडणुकीला मोठ्या ताकदीने सामोरे जाण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून निर्धार शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून याची सुरुवात ईशान्य मुंबईतील मुलुंड येथून आज रविवारी (ता. 9 मार्च) करण्यात येत आहे. याबाबतची महत्त्वाची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
मुलुंडमधील निर्धार शिबिराला सुरुवात होण्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, गेल्या काही काळातील शिवसेनेचे हे महत्त्वाचे शिबीर आहे. त्याला निर्धार शिबीर म्हटले आहे, मेळावा नाही. ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी याची जबाबदारी स्वीकारली आहे. आज मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळपासून शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना एक दिशा देण्यात येईल. अशा प्रकारचे कार्यक्रम, भाषणं, प्रेझेंटेशन्स याचे आयोजन आहे. स्वतः आदित्य ठाकरे हे या शिबिराचे उद्घाटन करतील आणि उद्धव ठाकरे हे समारोपाला येतील. मधल्या काळात शिवसेनेचे सर्व नेते अनेक विषयांवर मार्गदर्शन करतील, अशी माहिती राऊतांनी दिली.
तसेच, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसैनिकांना एक कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभरामध्ये विभागीय शिबिर आयोजित करावीत, असा एक निर्णय पक्षामध्ये झाला. त्यातील पहिले शिबीर हे मुंबईतील मुलुंडमध्ये होत आहे. यानंतर उत्तर महाराष्ट्रात जळगाव किंवा धुळ्यात होईल, नगरमध्ये होईल. सोलापुरात होईल, नाशिक, पुणे येथे हे शिबिर होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे. अशा प्रकारची शिबिर पूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून होत होती. त्याला खंड पडला. शाखाशाखांचे वर्धापन दिन आधी साजरे करत होते, त्यालाही आता सुरुवात करण्यात येईल. शिवसैनिकांच्या किंवा शिवसेनेचा जो मतदार आहे, त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आज जो निर्धार शिबिराचा कार्यक्रम आहे, त्यातून केवळ मुंबईतील नाही तर महाराष्ट्रातील शिवसैनिकांना दिशा मिळेल, अशी महत्त्वाची माहिती राऊतांनी दिली.