मुंबई : महायुती सरकारमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) आणि स्वीय सहाय्यक (PA) यांची नेमणूक करण्याबाबत वाद सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (24 फेब्रुवारी) नागपूरमध्ये याबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांकडून पीए आणि ओएसडी या पदासाठी पाठवण्यात आलेल्या नावांपैकी काही नावांना मंजुरी दिली नाही. तसेच, प्रशासकीय वर्तुळात ‘फिक्सर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ज्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे, त्यांच्या नावांना या पदासाठी मान्यता दिली नसल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. (Sanjay Raut Shivsena UBT criticized Shivsena Shinde group and Ajit Pawar)
हेही वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी थेट ट्रम्प यांनाच म्हटले थँक यू, पण का? वाचा –
हे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. अशावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “मंत्र्यांनी दिलेल्या यादीत 16 जण दलाल आणि फिक्सर होते. माझे मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना आव्हान आहे की, कोणत्या मंत्र्यांनी अशा फिक्सर लोकांची नावे पाठवली याची यादी जाहीर करावी. महाराष्ट्राच्या हितासाठी हे सर्वांसमोर आलेच पाहिजे.” असे ते म्हणाले. “हे सर्व दलाल किंवा फिक्सर्स आहेत हे सर्व एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे आहेत. माझ्याकडे 16 जणांची नावे आहेत. 16 पैकी 13 जणांची नावे ही शिंदेच्या पक्षातील मंत्र्यांनी दिली आहेत. तर अजित पवार यांच्या मंत्र्यांनी 3 जणांची नावे ही दिली आहे.” असा दावा त्यांनी यावेळी केला.
“अजित पवारांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांचा ते आदर राखतात. अजित पवार हे काही पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत. काहींनी तर गेल्या अडीच वर्षांत इतकी पाप केली आहेत, की गेल्या अडीच वर्षांमध्ये या पापाचा कडेलोट झाला आहे. या सर्व मंत्र्यांच्या पीएना रोखल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करतो. आमच्यामध्ये जरी राजकीय मतभेद असले, तरी राज्याच्या हितासाठी अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो,” असे म्हणत त्यांनी मुखामंत्र्यांचे अभिनंदन केले. “समर्थ रामदासांनी मुर्खाची जी दहा लक्षणे सांगितली, ती सर्व लक्षणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांमध्ये दिसत आहेत. आता मुर्खांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? आता तुम्ही गेलात ना, मग तिकडे तुमचे काम करत रहा. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मंत्र्याला पीए आणि ओएसडीच्या विषयावरून दम दिला.” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.