Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईGoregaon Fire : गोरेगाव पूर्वेत महिन्याभरात लागली दुसऱ्यांदा आग, शूटिंगचे सामान जळून खाक

Goregaon Fire : गोरेगाव पूर्वेत महिन्याभरात लागली दुसऱ्यांदा आग, शूटिंगचे सामान जळून खाक

Subscribe

फिल्मसिटीजवळ असलेल्या संतोष नगर परिसरात झोपडपट्टीत आग लागल्याची घटना घडली. घरांमध्ये असलेल्या सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट होऊ लागल्याने आग झपाट्याने वाढत गेली. या घटनेत 5 ते 6 सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग वाढल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

मुंबई : गेल्या महिन्याभरात पुन्हा एकदा मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः उपनगरातील गोरेगाव येथे महिन्याभरात दोन वेळा आग लागल्याची घटना घडली आहे. अशातच आता गोरेगाव पूर्व येथे महिन्याभरात दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गोरेगावमध्ये महिन्याभरात दोन वेळा पूर्वेला तर एकदा पश्चिमेला आगीच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी (ता. 20 फेब्रुवारी) सायंकाळी गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटी परिसरात भीषण आग लागली. या आगीत 100 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर मोठ्या प्रमाणात शूटिंगचे सामान जळाले असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष नगर परिसराला लागून असलेल्या झोपडपट्टीत भागात ही आग लागली. (Second time fire in Goregaon East within a month, shooting equipment burnt)

मिळालेल्या माहितीनुसार, फिल्मसिटीजवळ असलेल्या संतोष नगर परिसरात झोपडपट्टीत आग लागल्याची घटना घडली. घरांमध्ये असलेल्या सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट होऊ लागल्याने आग झपाट्याने वाढत गेली. या घटनेत 5 ते 6 सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग वाढल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटन घडली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सदर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. झोपड्या व त्यामधील सामान आणि फिल्म शूटिंगचे सामान यामुळे आग भडकली.

हेही वाचा… Mumbai Bakers : महापालिकेने विचार करावा; लाकडी, कोळसा भट्टी बंदी निर्णयावरून बेकर्स असोसिएशनची मागणी

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 7.50 वाजता आग स्तर-2 ची असल्याचे जाहीर केले. दरम्यान, आगीत ज्वालाग्राही सामान मोठ्या प्रमाणात जळाल्याने मोठे वित्तीय नुकसान झाले. झोपडीधारकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर तीन तासात नियंत्रण मिळविले. रात्री उशिराने आग पूर्णपणे विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र ही आग का व कशी काय लागली, याबाबत पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. सुमारे अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे.