मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पाचा आज तिसरा दिवस होता. सभागृहात दोन्ही शिवसेनेचे नेते विधानसभेत आमने – सामने आले. शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेल्या गैरप्रकारांची माहिती देण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात केला, मात्र त्यांना बोलू दिले नाही. दुसरीकडे महापुरुषांचा अवमान प्रकरणी भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली, त्यालाही विधानसभाध्यक्षांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे शिवसेना ठाकरे गटाने सभात्याग केला. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या काळात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार असल्याचे म्हटले. मुंबईतील रस्ता घोटाळा, एमएमआरडीए यांसंबंधीचे अनेक पत्र याआधीही दिलेले आहेत, ते सर्व मुख्यमंत्री फडणवीसांना देणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. विधिमंडळ परिसरात ते माध्यमांशी बोलत होते.
मुख्य सचिवांचे अभिनंदन…
मुख्य सचिवांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पत्र दिले आहे. अमृत योजनेत 57 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा उल्लेख त्या पत्रामध्ये आहे. हा अपहार एकनाथ शिंदे यांच्या मार्फत झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे, या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, मी मुख्य सचिवांचे अभिनंदन करतो. त्यांनी हा प्रकार उघड केला. या पत्रामुळे आता सर्वांना कळाले असेल की, तत्कालिन घटनाबाह्य मुख्यमंत्री हे मुख्य सचिव सुजता सौनिक यांच्या मागे का लागले होते? का त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते, हे समोर आले आहे.
जे चांगले लोक आहेत त्यांना बाजूला करून भ्रष्टाचार करायचा त्यांचा डाव होता. तोही उघडा पडला आहे. अशीच अनेक पत्रे मी देखील लिहिली होती. ती सर्व पत्रं आता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहोत. रस्ता घोटाळा, एमएमआरडीए, फ्रान्सने लिहिलेल्या पत्रातही एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली तर आम्ही देखील त्यांची साथ देऊ, कारण या महाराष्ट्रात पारदर्शक आणि स्वच्छ काम झालं पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.