Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईAaditya Thackeray : लढून जिंकायचेच, मुंबई आपल्याला वाचवायची आहे, आदित्य ठाकरेंचा निर्धार

Aaditya Thackeray : लढून जिंकायचेच, मुंबई आपल्याला वाचवायची आहे, आदित्य ठाकरेंचा निर्धार

Subscribe

ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई राखायची असल्याचा निर्धार केला. मुंबई जर वाचवायची असेल तर ती जिंकावीच लागेल, असेही ते म्हणाले.

Aaditya Thackeray On Mumbai : मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबईतील कालिदास नाट्यगृहात निर्धार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या उद्घाटनपर भाषणात ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई राखायची असल्याचा निर्धार केला. मुंबई जर वाचवायची असेल तर ती जिंकावीच लागेल, असेही ते म्हणाले. (shivsena ubt leader aaditya thackeray in nirdhar melava asks to retain mumbai)

लोकसभा निवडणुकीतील यश आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव, यावरही आदित्य ठाकरेंनी यावेळी भाष्य केले. लोकसभेत आपल्याला चांगलं यश मिळाले. त्यानंतर पदवीधर आणि सिनेट निवडणूक आपण जिंकलो. विधानसभा निवडणुकीतही आपण आपली घोडदौड सुरू ठेवली असती. पण व्होटर फ्रॉड झाला आणि त्यामुळे आपण हरलो. तो पराभव आपण स्वीकारला असला तरी येथून पुढे मुंबई, ठाणे, नागपूरला जाऊन लोकांना याची जाणीव करून द्यायला हवी, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत भाष्य केले.

आज जी मुंबईची अवस्था आहे ती पाहता, ती आपल्या हातातून गेली तर ती महाराष्ट्रापासूनच तुटेल. आणि एकूणच परिस्थिती पाहता आता मुंबई गुजरातच्या नाही तर अदानीच्या घशात जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आपली मुंबई जर टिकवायची, वाचवायची असेल तर लढणं गरजेचं आहे. आणि जिंकणं देखील असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

राज्यात आपलं सरकार असताना, मुंबईत आपण अनेक केली आहेत. या कामांचं उद्घाटन आता हे सरकार करत आहे. कोस्टलला मला कुठेही उभं करा, मी इंच इंचची माहिती देऊ शकतो. या कोस्टल रोडमुळे दीड तासांचा वेळ पंधरा मिनिटांवर आला आहे. अटल सेतूचं काम देखील यांनी लवकर पूर्ण केलं नाही. माझं दुःख एवढं आहे की, पाच वर्ष आपलं सरकार राहील असतं तर मुंबईचा आणखी विकास झाला असता. पण, तेच काम आता आपण मुंबई जिंकून करणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. बहुमतातलं सरकार सत्तेत आलं, पण याच भाजपातले अनेक लोक आम्हाला विचारतात, आपलं सरकार कसं आलं. महायुतीतील अनेकांची हीच भावना असल्याची टिप्पणी त्यांनी केली.

2022 ला गद्दारांनी सरकार पाडलं. त्यावेळी त्यांनी सरकार बनवलं पण आता सरकार त्यांचं आलंय, हा विश्वासच त्यांना बसत नाही. अजूनही जुने भाजपवाले विचारतात की, आपलं सरकार आलं कसं? जुने भाजपावाले म्हणजे वाजपेयी – आडवाणींच्या काळातील भाजपा. आजची भाजपा ही खरी नाही तर ती कॉन्ट्रॅक्टर्सची भाजपा आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.