मुंबई – शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना गद्दार म्हणत त्यांच्यावर आतापर्यंत शरसंधान साधले. आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाला ‘अनाजीसेना’ हे नाव दिले आहे. कितीही अनाजी पंत आले तरी महाराष्ट्राची परंपरा आणि मराठी भाषा संपणार नाही असे म्हणत रास्वसंघाचे सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांना अनाजी पंत म्हणत त्यांनी टीकेची झोड उठवली. शिवसैनिक अजून जिवंत आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. मुंबईतील फोर्ट येथे 49 वर्षांची परंपरा असलेल्या शिवराय संचलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आणि माजी सरकार्यवाह सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांनी मुंबईमध्ये मराठी भाषेबद्दल केलेले वक्तव्याने सरकारची कोंडी होत आहे. शिवेसेना ठाकरे गटाने सलग दुसऱ्या दिवशी या मुद्यावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सेनेला ‘अनाजीसेना’ म्हटले आहे, तर जोशींवर अनाजी पंत म्हणत टीका केली आहे. मुंबईतील फोर्ट येथे शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित शिवराय संचलनास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात त्यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिंदे सेनेला त्यांनी अनाजी सेना म्हणत हिनवले.
आजपासून ‘ती’ अनाजीसेना
उद्धव ठाकरे म्हणाले की, अनाजी पंतांकडून प्रेरणा घेत एक ‘अनाजी सेना’ तयार झाली आहे. स्वराज्यासोबत द्रोह करणं, भगव्याशी द्रोह करणं, हे अनजी पंतच करु शकतात. असा टोला ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपले दैवत आहेत. त्यांच्या पासून प्रेरणा घेणारे आपण शिवसैनिक आहोत. पण प्रत्येक काळातलं एक युद्ध असतं. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणे नाही, पण दुर्दैवाने अनाजी पंत आणि औरंगजेब हे जन्माला येत असतात. याही काळात ते आले आहेत. अशा शब्दात ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदेंचा नामोल्लख टाळत उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण जेसे शिवप्रेरणा घेऊन शिवसेनेची स्थापना केली. एक निष्ठेची पंरपरा 59 वर्षांपासून तीन पिढ्या त्याच मार्गाने पुढे घेऊन जात आहे. तसेच अनाजी पंतांकडून प्रेरणा घेत एक ‘अनाजीसेना’ आली आहे. त्यांचे नाव आजपासून ‘अनाजीसेना’. कारण स्वराज्यासोबत द्रोह हे अनाजी पंतच करु शकतात. असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
शिवसैनिक अजून जिवंत
आणखी एका अनाजी पंतांनी मराठी भाषेबद्दल गरळ ओकली. त्यांनी लक्षात ठेवावं हातात भगवा घेतलेले हे मावळे जिवंत आहेत. त्यामुळे अनाजी पंतांच्या कितीही पिढ्या आल्या तरी त्यांना महाराष्ट्राची परंपरा, मराठी भाषा संपवणे शक्य नाही, असा टोला त्यांनी संघाचे सदस्य जोशींना लगावला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. संचलनाची परंपरा गेली 49 वर्षांपासून सुरु आहे. शिवप्रेमी दरवर्षी अधिक उत्साहाने या संचलनात सहभागी होतात. हा उत्साह सदैव टिकून रहावा आणि शिवछत्रपतींचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, आवाहन ठाकरेंनी केले.
हेही वाचा : Sanjay Raut : संजय राऊत अडचणीत; आधी हक्कभंग, आता 10 कोटींच्या मानहानीचा दावा होणार